सर्वसाधारणत: विवाह ठरविताना मुलाच्या आणि मुलीच्या वयांचा विचार करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. कायद्याप्रमाणे तर विवाहाच्या वेळी मुलीचे वय कमीतकमी 18 पूर्ण आणि मुलाचे 21 पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच वधू आणि वर यांच्या वयांमध्ये वाजवीपेक्षा जास्त अंतर असू नये, याची दक्षता विवाह ठरविताना घेतली जातेच. त्यांना त्यांचे वैवाहिक जीवन अधिकतर काळ सुखाने जगता यावे, हा यामागचा उद्देश असतो. तथापि, प्रेम वय मानत नाही, असेही आपल्याला बऱ्याचदा पहावयास मिळते. वधू आणि वर यांचे वय लक्षात न घेता केले गेलेले विवाह काहीवेळा बऱ्याच अद्भूत बाबी घडवून आणतात.
डेन्ना बूमर नामक स्वीडीश महिलेच्या संदर्भात असेच घडले आहे. ती 38 वर्षांची असताना तिचे ती तिच्या पुतण्याच्या मित्राच्या प्रेमात पडली. तो तिच्या निम्म्या वयाचा होता. एक वर्षाने तिने त्याच्याशी विवाहही केला. या विवाहापूर्वी तिचे एक लग्न झालेले होते आणि तिला एक पुत्रही होता. आता अशी परिस्थिती आहे, की तिचे वय 46 वर्षांचे आहे. तिच्या पतीचे वय 27 आहे आणि तिच्या पहिल्या पुत्राचे वय 31 आहे. म्हणजेच तो आपल्या पित्यापेक्षा चार वर्षांनी मोठा आहे. या महिलेला एकंदर अपत्ये चार आहेत. इतकेच नव्हे, तर या महिलेची सासूही तिच्यापेक्षा लहान वयाची आहे. हा अनोखा विवाह आणि त्या विवाहातून निर्माण झालेली ही विचित्र नाती, सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय आहेत.
असा विवाह आणि अशी नाती सहसा कोठे नसतात. मोठ्या वयाच्या महिलेने तिच्यापेक्षा तुलनेने कमी वयाच्या असलेल्या पुरुषाशी विवाह केल्याची उदाहरणे कमी नाहीत. तथापि, वयामध्ये इतके अंतर आणि त्यामुळे निर्माण झालेली कौटुंबिक परिस्थिती सहसा पहावयास मिळत नाही. त्यामुळे हा विवाह झाल्यानंतर प्रारंभीचा काही काळ या कुटुंबाकडे समाजही वेगळ्या दृष्टीने पहात होता. पण आता सर्वकाही स्थिरस्थावर झाले आहे, असे या कुटुंबाचे म्हणणे आहे.









