मुंबईसह संपूर्ण राज्याला सध्या थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात अंतर्गत भागातील किमान तापमान 13 डिग्री सेल्सिअसवर नोंदवले गेले आहे. थंडी आली म्हणजे ऑक्टोबर हिट हुकली यावर सध्या गंभीर चर्चा-चर्वण सुरु आहे. गंभीर यासाठी कारण निसर्गचक्रच चुकल्याची भिती निर्माण केली जात आहे. मात्र ऑक्टोबर हिटला वैज्ञानिक अधिष्ठान नसून तो मानवी अनुभवांची नोंद असल्याचे आता हवामान वैज्ञानिकच सांगत आहेत. यंदा चुकलेली ऑक्टोबर हिट कदाचित पुढील वर्षी तीव्र असेल असा अंदाजही जोडला जात आहे. त्यामुळे उगीचच चिंता नको…
गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा दिवाळीच्या पहाटे थंडीने किंचित जोर केला होता. मुंबईसारख्या शहरातही सकाळी हवेत गारवा सुरु झाला आहे. थंडीचं स्वागत करत असतानाच तसेच ईशान्य मान्सूनच्या (आपण याला परतीचा पाऊस म्हणतो) धामधुमीत ऑक्टोबर हिट चुकल्याचे बोलले जात आहे. या चुकलेल्या वातावरणीय स्थितीला हवामान अरिष्ट कोसळल्याप्रमाणे गंभीर बोलले जात आहे. गेल्या तीन वर्षापासून ऑक्टोबर हिटचा कालावधी कमी होऊ लागला असल्याची निरीक्षणे नोंदवली जाऊ लागली. यातून परतीचा पाऊस लांबला यापासून ते ग्लोबल वॉर्मिंगपर्यंतच्या शंकाकुशंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. मात्र ऑक्टोबर हिट हा निव्वळ मानवी नोंद (रेकॉर्ड) अनुभव असून तो ऋतूचक्राचा भाग दरवर्षी तेवढय़ाच कालावधीसाठी असू शकतो असे समजणे चुकीचे असल्याचे हवामान वैज्ञानिक सांगत आहेत. किंवा तो ऑक्टोबर महिन्यात सुरु झालाच पाहिजे असा अट्टाहासी विचार करणे चुकीचे ठरते आहे. सप्टेंबर महिन्यापासूनच मुंबईतील कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस नोंदवले जाऊ लागले होते. तर कालच्या रविवारी 34 डिग्री सेल्सिअस पर्यंतवर पोहचले होते. म्हणजे या कालावधीत ऑक्टोबर हिट सुरु झाली होती. मात्र ती हवेतील बाष्पामुळे जाणवली नाही. कालच ऑक्टोबर म†िहना संपला. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा कालावधी संपल्याची आठवण सर्वांना होऊ लागली. दरम्यान दिवाळी साजरी झाली. त्यातून थंडीही सुरु झाली. हे ऋतूचक्र असून होळी आली की उन्हाळा सुरु होतो. तसेच दिवाळी सुरु झाली की थंडी सुरु होते. यात वावगे असे काहीच नसून हवामानात फारसा काही बदल झाला नसल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ हवामानतज्ञ तसेच निवृत्त संचालक रंजन केळकर यांनी मांडले. दरम्यान ऑक्टोबर हिटचा कालावधी कमी होत चालला आहे, या बाबीत काहीही तथ्य नसल्याचे केळकर यांनी सांगितले. निसर्ग महिने मोजत नसून तो दिवस, वर्ष आणि ऋतू मोजतो. मानव स्वतःच्या सोयीसाठी महिने मोजतो. त्यामुळे एखादा महिना संपला म्हणून त्या महिन्यातील हिट किंवा थंडी संपली असे होत नाही. निसर्गाला इंग्रजी महिन्यांशी देणेघेणे नाही. मात्र दिनदर्शिकेतील 28 दिवसांच्या चांद्र मासाशी निसर्गाचा जवळचा संबंध असतो. तसेच दुसऱया बाजूला ऑक्टोबर महिना नैऋत्य मान्सून व ईशान्य मान्सून अशा दोन मान्सूनचा कालावधी असतो. या दोन्ही मान्सूनच्या संधीकालात वाऱयाची दिशा बदलते. नैऋत्येहून येणारे वारे ईशान्येकडून येऊ लागतात. वारे वाहण्याच्या बदलाला मान्सून म्हटले जाते. जून ते सप्टेंबर महिन्याचा कालावधी नैऋत्य मान्सूनचा म्हटला जातो. मान्सून परतला की सुरु होणाऱया ऑक्टोबर महिन्यात उष्णता होणे गरजेचे आहे ही मानवी समजूत आहे. मात्र या गोष्टीला वैज्ञानिक अधिष्ठान नाही. पाऊस संपला की ऊन पडायला सुरुवात होते. त्यामुळे ऑक्टोबर हा महिना ऋतूबदलातील स्थित्यंतराचा महिना आहे. म्हणजेच नैऋत्य मान्सून तसेच ईशान्य मान्सून या दोन मान्सूनमधील हे स्थित्यंतर आहे. एखादी वातावरणीय स्थिती एका †िदवसात तयार होणारी नसते. ऑक्टोबर हिट ही मानवी अनुभवांची नेंद असून याला वैज्ञानिक अधिष्ठान नाही. त्यामुळे ऑक्टोबर हा महिना थंड की उष्ण राहणार हे मानव ठरवू शकत नाही. म्हणजेच निसर्गाला माणूस स्वतःच्या चौकटीत बसवू शकत नाही. उष्णता ही वाऱयाच्या †िदशेवर अवलंबून असते. राजस्थानमधून वारे आल्यास उष्ण लहर आली असे ढोबळ म्हटले जाते. मात्र ही लहरच असल्याने ती फक्त काही कालावधीसाठी असते. काही दिवसांसाठीच हे तापमान वाढते. तसेच उत्तरेकडून शीत वारे वाहू लागल्यास राज्यात शीत लहर आली असे म्हटले जाते. म्हणजेच वारे उष्ण किंवा थंड यावर थंडी किंवा उष्मा वाढला असे म्हटले जाते.
दरम्यान ऑक्टोबर हिट म्हणजे मानवी अनुभवांचे रेकॉर्ड असून यात विज्ञान नाही. निसर्गाबाबत शास्त्रज्ञांचेही बरेचसे निष्कर्ष चुकीचे ठरत असल्याने ऑक्टोबर हिट हुकली असे म्हणण्यात तथ्य नाही. हिटच्या हुकण्यावर भारतीय उपखंडात येणाऱया वादळांच्या संख्यांचे उदाहरण चपखल बसते. भारतावर एका वर्षात सरासरी सहा चक्रीवादळे येत असल्याचे म्हटले जाते. यात चार किंवा सातही चक्रीवादळे असू शकतात. पृथ्वी तापते म्हणून समुद्रही तापत आहे. समुद्र तापल्यावर चक्रीवादळाची संख्या आणि तीव्रता वाढते. चक्रीवादळे समुद्रावर तयार होतात. गेल्या वर्षी जागतिक हवामान वैज्ञानिकांनी भारताला मोठय़ा चक्रीवादळाचा धोका व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र यंदा भारतात चक्रीवादळे आली नाहीत. मे महिन्यात एक चक्रीवादळ तर दुसरे मागच्या आठवडय़ात आले. जर भारताला चक्रीवादळाचा धोका असल्याचा अंदाज करण्यात आला तर यंदा दोनच चक्रीवादळे का आली, या प्रश्नाची उत्तरे वैज्ञानिकांकडेही नसतात. म्हणजेच वैज्ञानिकांचे अंदाज चुकले असा अर्थ होतो. याचाच अर्थ निसर्गावर मानवाचे नियंत्रण नसून दिवस, वर्ष आणि ऋतू हे निसर्गाशी संबंधित आहेत.
त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील उष्मा तिसऱया वर्षी हुकला असे म्हणण्याऐवजी राज्यात थंडी सुरु झाली ही बाजू अधिक निसर्गस्नेही आहे. यंदा परतीचा पाऊस लांबला. म्हणजे पाऊस अधिक होता. त्याप्रमाणे थंडीही असू शकते असे अंदाज आता होऊ लागले आहेत. तसे पोषक वातावरण राज्यात निर्माण झाले आहे. एखाद्या वातावरणीय स्थितीने कमी कालावधी घेतल्यास वातावरणाच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो असे ढोबळ अंदाज करणे चुकीचे ठरू शकते. 2019 मध्ये 16 ऑक्टोबरला, 2020 मध्ये 28 ऑक्टोबर, 2021 मध्ये 25 ऑक्टोबर, तर 2022 मध्ये 23 ऑक्टोबरला पावसाने माघार घेतली. अरबी समद्रातून येणाऱया बाष्पामुळे परतीच्या पावसाचा कालावधी वाढला. त्यामुळे राज्यातील कमाल तापमान सरासरीच्या खालीच राहिल आणि ऑक्टोबर हिट चुकल्याची जाणीव झाली. आता थेट किमान तापमानांची नोंद सुरु झाली आहे. निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे राज्यातील अंतर्गत गारठा सुरु झाला आहे. निसर्ग चक्र मानवी अंदाजावर चालत नसून यंदा कोणत्या वातावरणीय स्थितीचा कमी झालेला कालावधी कदाचित पुढच्या वर्षी पूर्ण भरुन काढू शकतो. त्यामुळे यंदा कमी झालेला ऑक्टोबर हिटचा कालावधी कदाचित पुढच्या वर्षी प्रभावी ठरू शकतो असे अंदाजही केले जात आहेत.
राम खांदारे








