वृत्तसंस्था/ कोलकाता
आयसीसीच्या 2023 सालातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत येथे गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला. हा सामना चुरशीचा झाला पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चोकर्सची प्रतिमा पुसता आली नाही. आतापर्यंत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेला पाच वेळेला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यांना आजपर्यंत या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. सातत्याने दर्जेदार कामगिरी करूनही पुन्हा यावेळी त्यांच्या पदरी अपयश आले. गुरुवारच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेतर्फे एकाकी लढत देत डेव्हिड मिलरने शतक झळकविले होते. पण ते वाया गेले. दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत अनेक वेळेला विश्वचषक हुलकावणी दिली. पण एकदा आम्ही विश्वचषक जिंकू, असा विश्वास मिलरने या सामन्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.
दक्षिण आफ्रिका संघाला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आजपर्यंत ‘चोकर्स’ म्हणून ओळखले जाते. 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने प्रत्येक सामन्यात दर्जेदार कामगिरी करत उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. प्राथमिक फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेला यजमान भारत आणि नेदरलँडस् संघांकडून हार पत्करावी लागली होती. इडन गार्डन्सच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कोलमडली. पण डेव्हिड मिलरने ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर चिवट फलंदाजी करत शतक झळकविले. या शतकामुळेच दक्षिण आफ्रिकेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 213 धावांचे सोपे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजी केली. या संपूर्ण स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला मात्र उपांत्य सामन्यात अधिक धावा जमविता आल्या नाहीत. कर्णधार बहुमा, डि कॉक, क्लेसन, व्हॅन डेर, ड्युसेन, माक्रेम आणि अष्टपैलू कोझी अधिक धावा जमविण्यात अपयशी ठरले. पण मिलरची फलंदाजी कौतुकास्पद म्हणावी लागेल. अवघड परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेला मिलरने शतक नोंदवून बरेच सावरले. या उपांत्य सामन्यात आम्ही आमच्या क्षमतेनुसार निश्चितच चांगली कामगिरी केली असेही मिलरने म्हटले आहे. जेनसेन, रबाडा, केशव महाराज, शम्सी यांनी ऑस्ट्रेलियन संघाला फटकेबाजीपासून बऱ्याच प्रमाणात रोखण्यात यश मिळविले होते. सदर स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाविरुद्ध प्राथमिक फेरीत दक्षिण आफ्रिकेने चांगलाच खेळ केला. पण आम्हाला उपांत्य फेरीत यश मिळू शकले नाही. भविष्यकाळात दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदा निश्चितच विश्वचषक जिंकेल, अशी ग्वाही मिलरने दिली आहे.
2015 साली झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली होती. सदर स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमान पदाने भरविली गेली होती. पण ऑकलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात पावसाचा अडथळा आला होता. त्यानंतर न्यूझीलंडने डकवर्थ लेव्हीस नियमाच्या आधारे हा सामना केवळ एक चेंडू बाकी ठेवून जिंकला होता. कोलकातामध्ये गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्यापूर्वी कर्णधार बहुमा पूर्णपणे तंदुरूस्त नव्हता. पण हा सामना महत्त्वाचा असल्याने बहुमाने आपला सहभाग दर्शविला. पण केवळ चार चेंडू खेळल्यानंतर तो आपले खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतला. बहुमाने आपल्या कुशल नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिकेला वनडे क्रिकेटमध्ये निश्चितच वरच्या स्तरावर नेले असल्याने सदैव माझा त्याला पाठिंबा राहील, असे मिलरने शेवटी सांगितले.









