जि. पं. चे कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांची सूचना : शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी ग्रा. पं.-ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची
बेळगाव ; सध्या उन्हाळा सुरू आहे. कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, याची ग्राम पंचायतींनी काळजी घ्यावी. एप्रिल-मे मध्ये पाण्याचा मुबलक पुरवठा करण्यात यावा, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.रविवारी 9 एप्रिल रोजी ग्रामीण पिण्याचे पाणी व मलनि:स्सारण विभाग, जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकारी, सर्व तालुका पंचायतींच्या कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी ही सूचना केली आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी ग्राम पंचायती व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे, याची जाणीवही त्यांनी अधिकाऱ्यांना करून दिली. तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्प स्वच्छ राहतील, याची काळजी घ्यावी. फिल्टर, शुद्धीकरण यंत्र वेळेत बदलण्यात यावे. पाणीपुरवठा प्रकल्पांची नियमित स्वच्छता करावी. बहुग्राम पिण्याच्या पाणी योजनेंतर्गत धरणांमधून रोज किती पाणीपुरवठा केला जातो, याची पाहणी करून कार्यकारी अभियंते व साहाय्यक कार्यनिर्वाहक अभियंत्यांनी अहवाल देण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली.
गैरहजर राहिल्यास कठोर कारवाई
रोज नियमितपणे पाणीपुरवठा होतो आहे की नाही? याविषयी ग्राम पंचायतींच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी. संबंधित अधिकारी व तहसीलदारांबरोबर टास्क फोर्स समितीची वेळोवेळी बैठक घेऊन पाणीपुरवठ्यासंबंधी चर्चा करण्यात यावी. सर्व अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी राहून काम करावे. निवडणूक आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर रहावे, गैरहजर राहिल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पाण्याची समस्या उद्भवल्यास संपर्क करण्याचे आवाहन
ग्राम पंचायत पातळीवर पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवल्यास त्या समस्या दूर करण्यासाठी 9480985555 या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा, अशी सूचनाही हर्षल भोयर यांनी केली आहे. यावेळी जिल्हा पंचायतीचे नियोजन विभागाचे संचालक रवी बंगारप्पन्नावर व इतर अधिकारी उपस्थित होते.









