स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या फिडबॅकसाठी धावाधाव : आतापर्यंत 35 हजारांहून अधिक नोंद
बेळगाव : केंद्र सरकारने ग्राम स्वच्छ अभियानांतर्गत शहरातील व ग्रामीण भागातील जनतेची मते नोंदवून घेण्यासाठी वेबसाईट सुरू केली आहे. महापालिकेच्या हद्दीतीलही जनतेची मते नोंदवून घेण्यासाठी ही वेबसाईट सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त फिडबॅक मिळावा यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे. यामुळे पहाटेच्यावेळीच महापालिकेचे अधिकारी सोमवारी मंदिराच्या दारात उपस्थित होते व जनतेची मते नोंदवून घेत होते. शहरातील स्वच्छता मोहिमेबाबत आपले म्हणणे वेबसाईटद्वारे मांडायचे आहे. शहरामध्ये कशा प्रकारे स्वच्छता होत आहे, पुढे स्वच्छता करण्यासाठी काय उपाययोजना करावी, याबाबत अभिप्राय मागण्यात येत आहेत. जवळपास शहरातील 41 हजारांहून अधिक जणांनी या वेबसाईटच्या माध्यमातून अभिप्राय नोंदवून घ्यायचे आहेत. त्यासाठी 8 हजार जणांची येत्या दोन दिवसांत गाठभेट घेऊन त्यांचे अभिप्राय नोंदवून घ्यावयाचे आहेत.
सोमवार असल्यामुळे महापालिकेचे अधिकारी सिद्धेश्वर मंदिर, कणबर्गी आणि कपिलेश्वर मंदिरासमोर उपस्थित राहून जनतेचे अभिप्राय नोंदवून घेत होते. महापालिकेचे साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी भक्तांना शहरातील कचरा व इतर समस्यांबाबत विचारले. त्यावेळी अनेकांनी तक्रारी नोंदविल्या. मात्र अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला फिडबॅक पाठवून द्यायचा आहे. त्यामुळे आमच्या शहराचा क्रमांक येवू शकतो. त्यासाठी चांगला अभिप्राय नोंदवा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. सोमवार असल्याने सिद्धेश्वर तसेच महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. त्यामुळे महापालिकेचे अधिकारीही त्याचठिकाणी अभिप्राय नोंदवून घेत होते. आतापर्यंत 35 हजारांहून अधिक जणांनी अभिप्राय नोंदविले आहेत. आणखी दोन दिवसच शिल्लक असून त्या दोन दिवसांमध्ये आपले लक्ष्य पूर्ण करण्याचा निर्धार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.









