कोल्हापूर / संतोष पाटील :
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्या, नियमित कचरा उठाव करा, कार्यालयात वेळेत या, बैठकांना वेळेपूर्वीच हजर रहा, कार्यालय आणि परिसर स्वच्छ ठेवा, उदिष्टपूर्ती वेळेत करा, याचे धडे रोज द्यावे लागत आहेत. इतक्यावर न थांबता प्रशासकांना दर काही आठवड्यांनी कचरा उठाव यंत्रणेपासून अधिकारी आणि कर्मचारी वेळेत कार्यालयात येतात की नाहीत याचीही झाडाझडती घ्यावी लागते. तीन–तीन वेळा पगार कपात करुनही येथील अधिकारी आणि कर्मचारी सुधारत नसतील तर हे अधिकारी आहेत की शाळेतील उनाड पोरं असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे.
कचरा निकराकरण, शुध्द मुबलक पाणी अन् दर्जेदार रस्ते देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून व्हावा इतकीच अपेक्षा शहरवासीयांची आहे. यासाठी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचा कटाक्ष असला तरी प्रशासकीय यंत्रणा ढिलेपणा अनेकवेळा स्पष्ट झाला आहे. टक्केवारीच्या राजाश्रयाने सुरू असलेल्या विकासकामात वरुन–खालीपर्यंत सर्वांना लक्ष्मीदर्शन दिल्याने कोणी लक्षच देणार नाही, या अविर्भावात असलेल्या यंत्रणेला प्रशासक के. मंजुलक्ष्मी यापूर्वीच धक्के देत वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरकरांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरलेल्या खराब रस्ते बांधणीत खडी–डांबरही खाण्रायांना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला.
महापालिकेच्या एकूण आस्थापनापैकी अर्धे कर्मचारी आरोग्य विभागात आहेत. मनपाचा एकूण महिन्याला कर्मच्रायांच्या पगारावर खर्च होण्राया 16 कोटींपैकी अर्धा पगार आरोग्यावरच खर्च होतो. मनपाचे इतर विभागांना महसुल वाढीचे टार्गेट असते. पण कोट्यावधीचा निधी फक्त खर्चच करायचा आणि दैनंदिन कामाचे ऑडीट करणेही मुश्किल असलेला हा विभाग आपले कोणीही वाकडे करु शकत नाही या अवर्भात होता. त्यामुळेच वर्षाला किमान 50 कोटींचा खर्च करण्राया या विभागात खाबूगिरीहीवरुन खालीपर्यंत फोफावली. या विभागाची झाडाझडती करत प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी कच्रयातून अर्थ शोधण्राया आरोग्य विभागाला जोराचा करंट दिला.
महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी 29 जानेवारीला बोलावलेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त, शहरअभियंता, जल अभियंता, उपायुक्त–सहाय्यक आयुक्त, उपशहर अभियंता पासून सर्वच कनिष्ठ अभियंत्यांची गुरूवारी अक्षरश: कार्यशाळाच घेतली. या बैठकीला उशीरा आलेल्या एका उपायुक्तासह 11 अधिक्रायांचे अर्धे दिवसाचे खाडे मांडले. येत्या तीन महिन्यात कामात प्रगती न झाल्यास या अतिवरिष्ठ अशा सर्वच अधिक्रायांना त्यांच्या मुळ विभागात पाठवण्याची सक्त ताकीद वजा इशारा दिला होता. यानंतर सोमवारी प्रशासकांनी केलेल्या फिरतीवेळी सहाय्यक आयुक्तांसह उप शहर अभियंता आणि 29 कर्मचारी कामावर नसल्याचे आढळल्याने एक दिवसाचा पगार कपात केला. आमच्यावर कितीही वॉच ठेवा, किती वेळा पगार कपात करा, कसल्याही कारवाईचा इशारा द्या, आम्ही आमच्या मनाप्रमाणेच काम करणार ? महापालिकेत शासनाकडून आलेल्या अधिक्रायांचा भरणा आहे. या अधिक्रायांच्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा देण्याऐवजी महापालिकेच्या तिजोरीवर भारच पडत आहे. प्रशासक सांगतील तेवढेच काम करून हे वरिष्ठ अधिकारी धन्यता मानतात. प्रत्यक्षात शहरवासीयांना त्यांच्या कामाचा लाभ होताना दिसत नाही. दुसरीकडे, मुळच्या कर्मच्रायांना आणि अधिक्रायांना बदलीची भीतीही नाही. शहराचा परिघ अवघा सहा किलोमीटरचा असल्याने एका विभागातून दुस्रया विभागात बदली झाली तरी त्याचा फारसा परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत या कामचुकार यंत्रणेला वठणीवर आणायचे कसे, हा प्रश्न आहे.
- हम कभी नही सुधरेंगे…!
दोन अडीच वर्षासाठी मनपात येणारे प्रशासक किंवा आयुक्त दर्जाचे अधिकारी शहरांविषयी तळमळ दाखवतात. शाहू नगरीत काम करण्याचे भाग्य लाभल्याचे मानत हे अधिकारी प्रामाणिकपणे सेवा देतात. प्रशासक के. मंजूलक्ष्मी या शहरातील कचरा उठाव, पाणी पुरवठा, विकासकामे आणि रस्ते बांधणीच्या कामासह लोकाभिमूक प्रशासनाकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. ही कोल्हापूरकरांसाठी जमेची बाजू आहे. मात्र ती तळमळ मनपात कायम सेवेत असलेल्या इतर वरिष्ठ अधिक्रायांत क्वचितच दिसते. महापालिका आणि कोल्हापूर शहर माझं आहे, याभावनेतून काम करण्रायांचा जमाना संपला की काय ? महापालिकेचे वार्षिक महसुली उत्पन्न 360 कोटी रुपये असले तरी त्यापैकी 240 कोटी 85 लाख रुपये आस्थापना खर्चावर खर्च होतात. यात कर्मच्रायांचे पगार, वीज बिल, प्राथमिक शिक्षण, परिवहन, पेन्शन यांचा समावेश आहे. देखभाल–दुरुस्तीसह इतर खर्च वजा जाता शहराच्या विकासकामांसाठी केवळ 45 ते 50 कोटी रुपये शिल्लक राहतात. सहा लाख लोकसंख्येच्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा निधी अत्यंत तोकडा आहे. तरीही महापालिकेची यंत्रणा सुस्तावलेलीच आहे. अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर कामावर येत नाहीत, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात आणि प्रशासनाला गती देण्याऐवजी “हम नही सुधरेंगे“ अशीच भूमिका घेताना दिसतात.








