चौकशी अहवाल देण्याची महापौरांची सूचना : रवी साळुंखे यांच्याकडून प्रश्नांचा भडिमार
बेळगाव : महानगरपालिकेकडून अनुसूचित जाती-जमातीतील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या लॅपटॉपमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुरूच आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीतदेखील लॅपटॉपचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. पात्र विद्यार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याऐवजी त्यांना लॅपटॉप देणे चुकीचे आहे. वितरित केलेले लॅपटॉप पुन्हा परत घेण्यात आल्याने याबाबत बैठकीत नगरसेवक रवी साळुंखे यांनी प्रश्नांचा भडिमार केला. अधिकारी प्रश्नांची उत्तरे देण्यास अनुत्तर झाले. त्यातच नगरसेवक रवी धोत्रे यांनी मधेच उठून बोलण्याचा प्रयत्न केल्याने शाब्दिक चकमक झाली. शेवटी या प्रकरणाची चौकशी करून आपल्याला अहवाल द्यावा, अशी सूचना महापौर मंगेश पवार यांनी मनपा आयुक्तांना केली.
कथित लॅपटॉप घोटाळा संदर्भाची सविस्तर माहिती देण्याची मागणी बुधवारी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत करण्यात आली. यावेळी प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार म्हणाले, यापूर्वी महापालिकेकडून एससी-एसटी समाजातील वैद्यकीय व अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जात होती. मात्र महापौर कक्षात आपल्याला बोलावून घेऊन पैशाऐवजी लॅपटॉप खरेदी करून त्यांचे वितरण विद्यार्थ्यांना करावे, अशी सूचना करण्यात आल्याने आपण लॅपटॉप दिले आहेत, असे सांगितले. यासाठी कायदेशीर निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली आहे.
एकूण 120 विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले आहेत, अशी सर्व माहिती त्यांनी सभागृहाला दिली. उगीच काही तरी सांगून लोकांची दिशाभूल करू नये, चौकशीत महापालिकेला क्लिन चिट मिळाली आहे. 35 हजार किमतीचे लॅपटॉप 48 हजार रुपयांना खरेदी करण्यात आल्याने सध्या हे प्रकरण गाजत आहे. आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष श्रीशैल कांबळे यांनी लॅपटॉप खरेदी करण्यासंबंधीचा घेतलेला निर्णय पारित न करता तो पुन्हा स्थायी समितीकडे वर्ग करण्यात यावा, कारण या प्रकरणांमुळे सत्ताधारी अडचणी येऊ शकतात, असे सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाली यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक रवी साळुंखे म्हणाले, एका नामांकित कंपनीचे लॅपटॉप वितरित करण्यात आले आहेत. ते ओरिजनल आहेत की जुने आहेत? अशी विचारणा केली. देण्यात आलेले 12 लॅपटॉप पुन्हा परत का घेण्यात आले. लॅपटॉप देण्यापूर्वीच त्यांच्या गुणवत्ता व दर्जाची तपासणी का झाली नाही? अशी विचारणा यावेळी केली. ते सभागृहात बोलत असतानाच अचानक मधेच नगरसेवक रवी धोत्रे उभे राहून बोलण्यास सुरुवात केली. धोत्रे यांनी साळुंखे यांच्या प्रश्नाला छेद देण्याचा प्रयत्न केला. आपण महापौरांना उद्देशून प्रश्न विचारला आहे. तुम्ही मधे बोलण्याचे कारण नाही, असे साळुंखे यांनी सुनावले. त्यावर महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी लॅपटॉप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे असे सांगितले. त्यावर चौकशी करून मला अहवाल सादर करावा, अशी सूचना महापौर मंगेश पवार यांनी मनपा आयुक्तांना केली.
झाडे तोडण्यासाठी येणार 10 लाख रुपये खर्च
पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडे हटविण्यासंदर्भात महापालिका आणि वनखात्याकडून संयुक्तरित्या सर्व्हे केला जात आहे. दक्षिण मतदारसंघात 20 तर उत्तर मतदारसंघात 80 झाडे धोकादायक आहेत. ती हटविण्यासाठी 10 लाख रुपये खर्च येणार आहे. महापालिकाच संबंधित ठेकेदाराची नियुक्ती करणार असून लाकूड साठा विविध स्मशानभूमीत उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे मनपाचे पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी यांनी सांगितले.
शहरवासियांना कंदील वाटप करावे का?
पावसाळ्यापूर्वी शहरातील विविध समस्यांवर चर्चा करून त्या मार्गी लावण्यासाठी मंगळवारच्या सर्वसाधारण बैठकीला हेस्कॉम, वनखाते, एलअँडटी यासह इतर खात्याच्या अधिकाऱ्यांना देखील बोलाविण्यात आले होते. विरोधी गटनेते मुजम्मिल डोणी यांनी बैठकीत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना मिश्कील टोला लगावत कान टोचले. शहरात कोणत्यावेळी वीजपुरवठा खंडित होईल हे सांगता येत नाही. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता व्यवस्थित उत्तर मिळत नाही. यावर पर्याय म्हणून शहरवासियांना कंदील वाटप करावे का? असे विचारत कंदीलांचे काही नमुने सभागृहात त्यांनी दाखविले. त्यामुळे हेस्कॉम अधिकाऱ्यांना याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली.









