बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयातील अनागोंदी कारभाराची दखल घेऊन बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी बुधवारी कार्यालयाला अचानक भेट दिली. पेन्शन तसेच घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने त्यांनी तहसीलदारांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ताशिलदार गल्ली येथील लक्ष्मी मुतगेकर यांचे घर कोसळून नुकसान झाले होते. राहते घर कोसळल्यामुळे लक्ष्मी यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी नुकसान भरपाईसाठी मागणी केली होती. अनेकवेळा तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही त्यांना मदत मिळत नसल्याचे आमदार आसिफ सेठ यांना समजले. त्यांनी बुधवारी सकाळी त्या आजींसोबत तहसीलदार कार्यालय गाठले आणि सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पेन्शन तसेच इतर कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची तक्रार काहीजणांनी व्यक्त केली. नागरिकांना होणारा त्रास सहन करून घेतला जाणार नाही. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आमदारांनी दिला. नगरसेवक मुज्जमील डोणी म्हणाले, अधिकारी नागरिकांपेक्षा एजंटाची कामे लवकर करून देत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे दिसून येत आहे. खेदाची बाब म्हणजे एका वयोवृद्ध आजीच्या मदतीसाठी आमदारांना कार्यालयात यावे लागले. त्यामुळे येथील कारभार सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. यावेळी तहसीलदार बसवराज नागराळ, नगरसेवक रवि साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते शकील मुल्ला यांच्यासह इतर उपस्थित होते.









