कंत्राटदार हवालदिल, चैकशीची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
साबांखाची विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांची ‘कमिशन’ साठी सतावणूक होत असून साबांखा बरोबरच मुख्यमंत्री कार्यालयातीलही काही अधिकारी यात गुंतले असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी केला आहे.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर आणि युवा काँग्रेस उत्तर जिल्हाध्यक्ष रिनाल्डो ऊझारियो यांची उपस्थिती होती.
सरकारी कामे करण्यासाठी साबांखा कंत्राटदार आधी स्वत:चे पैसे गुंतवतात. मात्र, नंतर बिले फेडण्याच्यावेळी त्यांचा छळ करण्यात येतो. साबांखा मंत्र्यांचे काही अधिकारी तर निविदा प्रक्रियेपासूनच कमिशनसाठी हात पुढे करतात. त्याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकारही कमिशनसाठी हट्ट धरतात. त्यामुळे एकाच कामासाठी दोन दोन ठिकाणी पैसे चारावे लागतात, असे भिके म्हणाले.
अशाप्रकारे कंत्राटदारांना त्रास देऊन सरकार राज्यात ‘मिशन टोटल कमिशन’चा फॉर्म्युला राबवत आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, असे भिके यांनी सांगितले.
अशा प्रकारांमुळे कंत्राटदार कंटाळले असून त्याचा परिणाम साबांखाची कामे संथगतीने होण्यामध्ये झाला आहे. सरकारची सर्व खाती सायलंट मोडवर गेली आहेत. त्यामुळे राज्यात कोणतेही काम पूर्णत्वाच्या अवस्थेत दिसत नाही. परिणामी लोकांचे हाल होत आहेत, असे भिके म्हणाले.
पणजीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेली आणि होत असलेली कामे आज जरी स्मार्ट वाटत असली तरी पहिल्याच पावसात त्यांचे खरे स्मार्टनेस लोकांना पहावयास मिळणार आहे. त्यातून या प्रकल्पातील भ्रष्टाचारही उघड होईल, असे ते म्हणाले.
रोजगार निर्मितीत ‘डबल इंजिन’ सपशेल अपयशी
दरम्यान, राज्यात रोजगार निर्माण करण्यात डबल इंजिन सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप ऊझारियो यांनी केला आहे. गत जानेवारीत बेरोजगारी दर 16.5 टक्के होता. बेरोजगारी प्रचंड वाढली असून याप्रश्नी सरकार गंभीर नसल्याने तऊणांना नोकरीच्या शोधात अन्य राज्यात किंवा देशात जाण्यास भाग पाडले जात आहे, असे ते म्हणाले.









