साहूंकडून आतापर्यंत 354 कोटी जप्त : रांचीच्या निवासात अजूनही मोजदाद : ओडिशा, पश्चिम बंगालमधील छापेमारी पूर्ण
वृत्तसंस्था/ रांची, भुवनेश्वर
काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील घरांवर छापे टाकत केलेली कारवाई पूर्ण झाली आहे. याठिकाणी 6 डिसेंबरपासून छापे टाकण्यात आले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 354 कोटी ऊपये मिळाले आहेत, मात्र अनेक ठिकाणी हा आकडा 500 कोटींच्या पुढे असल्याचे बोलले जात आहे. आता प्राप्तिकर विभागाची टीम फक्त धीरज साहू यांच्या रांची येथील निवासस्थानावर कार्यरत असून तेथे अजूनही रोकड आणि इतर मालमत्ता दस्तावेजांची तपासणी सुरू आहे.
ओडिशातील मद्य उत्पादक कंपनीच्या गटाशी संबंधित विविध ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे सोमवारी सलग सहाव्या दिवशी सुरू राहिले. आतापर्यंत एकूण 354 कोटी ऊपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. देशभरातील कोणत्याही तपास यंत्रणेने एका कारवाईत जप्त केलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. बौध जिह्यातील काँग्रेस खासदाराच्या कुटुंबाच्या मालकीच्या बौध डिस्टिलरीजच्या सुदापाडा युनिटमध्ये प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 6 डिसेंबर रोजी शोधमोहीम सुरू केली होती. संबलपूर, टिटलागड, सुंदरगड, बोलंगीर आणि भुवनेश्वर येथेही छापे टाकण्यात आले. प्राप्तिकर विभागाच्या पथकाने रविवारी रात्री जप्त केलेल्या रोख नोटांची मोजणी पूर्ण केली. आता जप्त केलेल्या कागदपत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे.









