हलशी-हलगा रस्त्याची होणार डागडुजी
खानापूर : हलशी-नागरगाळी रस्त्याचे काम गेल्या चार वर्षापासून सुरू आहे. हलशी ते हलगा हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले असून पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावर पाणी साचून डबक्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, म्हणून हलगा ग्रा. पं.चे सदस्य रणजीत पाटील आणि हलगा परिसरातील नागरिकांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी संजय गस्ती आणि कर्मचाऱ्यांनी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. तसेच येत्या आठ दिवसात रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करू, असे आश्वासन दिले. हलशी-हलगा रस्त्याचे गेल्या चार वर्षापासून काम सुरू आहे.
मात्र ठेकेदाराने काम अर्धवट सोडून पलायन केल्याने संपूर्ण रस्ताच उद्ध्वस्त झाला आहे. पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून डबक्याचे स्वरुप निर्माण झाल्याने या रस्त्यावरुन साधी दुचाकी चालविणेसुद्धा धोकादायक बनले आहे. यासाठी ग्रा. पं. सदस्य रणजीत पाटील आणि हलगा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी संपूर्ण रस्त्याची आणि रस्त्याच्या अवस्थेची पाहणी केली. यानंतर संबंधित कंत्राटदाराला दूरध्वनीवरुन संपर्क साधून येत्या चार दिवसात रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करून देण्यात यावा, अशी सक्त ताकीद दिली. तसेच पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी संजय गस्ती यांनी दिला. यावेळी रणजीत पाटील यांनीही जर रस्त्याची आठ दिवसात डागडुजी न केल्यास कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.









