20 हजाराचे रोख पारितोषिक : पोलीस आयुक्तांच्या हस्ते बक्षीस वितरण
बेळगाव : अयोध्येतील राम मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी शहराच्या शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न हाणून पाडणारे अधिकारी व पोलिसांचा शुक्रवारी पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस परेड ग्राऊंडवर हा कार्यक्रम झाला. दगडफेकीची घटनाच घडली नाही, असा पवित्रा घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या दिवशी प्रसारमाध्यमांची दिशाभूल केल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. स्वत: पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत झालेल्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व उपनगरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याच दिवशी रात्री दरबार गल्ली व फोर्ट रोडवर काही समाजकंटकांनी दंगल घडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो हाणून पाडल्याची माहिती दिली आहे.
आरपीआय विठ्ठल कोकटनूर, मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर, पोलीस उपनिरीक्षक महांतेश मठपती, नवीनकुमार ए. बी., मल्लिकार्जुन गुंजीकर, नागराज भीमगौडा, आर. एस. कोलकार, के. एस. नागराळे, मनोहर पाटील, अशीर जमादार, राजू कडाप्पगोळ यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन समाजकंटकांचे प्रयत्न हाणून पाडले. शुक्रवारी सकाळी पोलीस परेड मैदानावर झालेल्या साप्ताहिक परेडनंतर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्या हस्ते 20 हजार रुपये रोख बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर एम. बी., गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी आदींसह शहरातील अधिकारी उपस्थित होते.
22 जानेवारीची घटना
22 जानेवारी रोजी रात्री क्लब रोड व दरबार गल्ली परिसरात दगडफेक करून शहरात अशांतता माजविण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी अशी घटनाच घडली नाही, असा पवित्रा घेतला होता. जर दगडफेकीची घटना घडलीच नव्हती तर आजचा दंगल रोखल्यासंबंधीचा सत्कार कसा काय करण्यात आला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









