वृत्तसंस्था / विजयवाडा
आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करणारे सीआयडी पोलीस अधिकारी एन. संजय यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर एक कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यांची दक्षता आयोगाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आहे. चौकशीत त्यांच्याविरोधात पुरावे आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती आंध्र प्रशासनाने दिली आहे.
त्यांनी हा अपहार ते आंध्र प्रदेशच्या आपत्कालीन साहाय्यता विभागाचे प्रमुख असताना केला होता, असा आरोप आहे. मागच्या वेळी चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कौशल्य विकास योजनेत भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांच्यावर त्यांची सत्ता गेल्यानंतर ठेवण्यात आला होता. एन. संजय यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. त्यांनी चंद्राबाबू नायडू यांना अटकही केली होती. मात्र, आता हेच एन. संजय पैशाचा अपहार केल्याच्या प्रकरणात अडकले असून त्यांची चौकशी केली जात आहे. त्यांच्यावर काही खासगी कंपन्यांना सरकारी पैशाचे वाटप केल्याचाही आरोप आहे. ही रक्कम एक कोटीहून अधिक रुपयांची आहे. त्यामुळे राज्याचे सध्याचे मुख्य सचिव नीरभ कुमार प्रसाद यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे, अशी माहिती देण्यात आली.









