गुजरातमधील घटना ः कर्तव्यात निष्काळजीपणाचा ठपका
@ वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमधील कच्छ जिह्यातील भुज येथील एका नागरी अधिकाऱयावर सरकारी कार्यक्रमात झोपल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित अधिकाऱयाचे नाव जिगर पटेल असे आहे. जिगर ते भुज नगरपालिकेचे मुख्याधिकारी होते. शनिवारी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री मंचावरून संबोधित करत असताना जिगर पटेल हे आपल्या आसनावरच झोपी गेले होते. ते झोपत असतानाचे चित्रीकरण करून तो व्हिडीओ कोणीतरी सोशल मीडियावर पसरवला होता. त्यानंतर राज्याच्या नगरविकास आणि नगर गृहनिर्माण विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. शनिवारी सायंकाळी त्यांना विभागाने तत्काळ प्रभावाने निलंबित केल्याचे नगरविकास व नगर गृहनिर्माण विभागाने जाहीर केले. निष्काळजीपणा आणि कर्तव्यात नि÷ा नसल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ज्या कार्यक्रमात ही घटना घडली त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल कच्छमधील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यासाठी गेले होते. या कार्यक्रमात पटेल यांनी सुमारे 14,000 लोकांना गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरांच्या मालकीची कागदपत्रे वितरित केली.









