ईडीकडून 3 जणांवर कारवाई
वृत्तसंस्था /रायपूर
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुरुवारी छत्तीसगडमधील आयएएस अधिकारी समीन विर्श्नो, इंद्रमणि समुहाचे सुनील अग्रवार आणि लक्ष्मीकांत तिवारी यांना अटक केली आहे. ईडीने रायपूर येथून या तीन जणांना अटक केली आहे.
आयएएस अधिकारी विश्नोई, सुनील अग्रवाल आणि लक्ष्मीकांत तिवारी यांना पीएमएलएच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. यापूर्वी ईडीने छत्तीसगड इन्फोटेक प्रमोशन सोसायटीचे सीईओ तसेच आयएएस अधिकाऱयाची बुधवारी चौकशी केली होती.
शासकीय अधिकारी, व्यावसायिक आणि खासगी संस्थांनी संगनमत करत राज्यातील ट्रान्सपोर्टर्सकडून अवैध रक्कम वसूल केल्याचा आरोप आहे. याच्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने 11 ऑक्टोबर रोजी छत्तीसगडमध्ये छापेमारी केली होती. तर या कारवाईप्रकरणी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हा भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत केंद्र सरकारला लक्ष्य केले होते.
ईडीने छत्तीसगडमधील छाप्यांमध्ये सुमारे 4 कोटी रुपये रोख आणि दागिने हस्तगत केले होते. ईडीने प्राप्तिकर विभागाची तक्रार आणि आरोपपत्राची दखल घेत मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. प्राप्तिकर विभागाने यापूर्वी राज्य सरकारला पत्र लिहून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे निकटवर्तीय असणारे काही अधिकारी कोळसा तसेच अन्य व्यापाऱयांकडून कमिशन/लाच घेण्याच्या प्रकारात सामील असल्याचे कळविले होते. परंतु राज्य सरकारकडून यासंबंधी कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. ईडीने आयएएस अधिकारी जे.पी. मौर्य आणि रानू साहू यांच्या निवासस्थानीही छापे टाकले हेते. तसेच तीन आयपीएस अधिकाऱयांच्या घराची झडती घेतली होती.









