खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसची बैठक : एआयसीसीच्या सचिव अंजली निंबाळकर यांचे आवाहन
खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद बाजूला सारुन सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मजबुतीसाठी काम करावे, मी वैयक्तिक कधीही जातीपातीचे राजकारण केलेले नाही. भविष्यातही हे करणार नाही. काँग्रेस पक्ष हा सर्वधर्म, जातींना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. मानवतेच्या विचारधारेवर काँग्रेस पक्ष उभा आहे. सध्याच्या राजकारणात काँग्रेसच देशाला दिशा दाखवू शकतो. त्याचप्रमाणे काँग्रेसच सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपापसातील मतभेद बाजूला सारुन तालुक्यात काँग्रेसची विचारधारा शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे, असे वक्तव्य एआयसीसीच्या सचिव आणि तालुक्याच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना ब्लॉक काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
नुकतीच खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसची बैठक रायगड या निवासस्थानी बोलाविण्यात आली होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी काँग्रेसची विचारधारा सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून काँग्रेसला तालुक्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच येऊ घातलेल्या तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सर्वांनी जोमाने कामाला वाहून घेतले पाहिजे. तसेच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. मी स्वत: तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच पंचहमी योजनांची योग्यरीतीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
तालुक्यातील सहकार चळवळीत गोंधळ निर्माण झाला आहे. यासाठी सहकारात परिवर्तन होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षही जोरदारपणे आपली ताकद लावणार आहे. तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहे. यासाठी तालुकास्तरीय व्यापक बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सूचनांचा विचार करून मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे डॉ. अंजली निंबाळकर यांनी सांगितले. या बैठकीला केपीसीसी सदस्य महादेव कोळी, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी, शहराध्यक्ष महांतेश राऊत, महिला अध्यक्षा सावित्री मादार, वैष्णवी, पाटील, दीपा पाटील, यशवंत बिर्जे, लक्ष्मण मादार, तोहीद चांदकन्नावर, विनायक मुतगेकर, मधूकर कवळेकर उपस्थित होते.









