आटपाडी :
देश–विदेशातील कोट्यावधी भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री. सिध्दीविनायक मंदिरात श्रींच्या मूर्तीला आटपाडीतील डाळिंबांची आरास करण्यात आली. सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासचे विश्वस्त राजाराम देशमुख यांच्या पुढाकाराने गणरायाच्या चरणी आटपाडीतील शेतकऱ्यांच्या कष्टाची फळे अर्पण करत शेतकऱ्यांच्या व आटपाडीच्या उन्नतीसाठी साकडे घातले.
राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रात आटपाडीचे सुपुत्र राजाराम देशमुख यांनी ठसा उमटविला आहे. मुंबईतील प्रसिध्द सिध्दीविनायक देवस्थानचे विश्वस्त म्हणुन त्यांनी केलेले कार्य राज्यात आणि देशातही गौरविले गेले. शिवाय परदेशातील भक्तांनीही राजाराम देशमुख यांनी देवस्थानचे विश्वस्त म्हणुन दिलेले योगदान प्रशंसनिय असल्याची भावना मांडल्या आहेत.
आटपाडी तालुक्याचा पुर्वीचा दुष्काळाचा कलंक पुसला गेला आहे. ओसाड माळरानावर हिरवाई फुलली आहे. येथील शेतकऱ्यांनी अनेक संकटावर मात करत डाळिंबातून भक्कम प्रगतीची वाटचाल कायम ठेवली आहे. आटपाडीतील याच डाळिंबांची सिध्दीविनायक देवस्थान चरणी आरास करून भक्ती आणि शेतकऱ्यांचा कष्टाचा सुरेख मिलाप राजाराम देशमुख यांनी घडविला आहे.
स्वत:सह गणेश सुर्यवंशी, शिवाजी सुर्यवंशी यांच्या शेतात पिकविलेल्या डाळिंबाव्दारे गणरायाची आरास करण्याचे काम राजाराम देशमुख यांनी केले. शेतकऱ्यांची ही उन्नती अशीच कायम रहावी, शेतकऱ्यांचे जीवनही अशा फळपिकांनी भरभराटीस यावे, अशी प्रार्थना देशमुख यांनी सिध्दीविनायक चरणी केली. तालुक्याने डाळिंब, गलाई, खिलार जनावरे, शेळ्या–मेंढ्यांसह सराफ–गलाई व्यवसायातुन वाटचाल कायम ठेवली आहे. हे होत असताना आत्ता माणदेश जिल्हा निर्मीतीच्या हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये माणदेशातील मुख्य घटक असलेल्या आटपाडीला प्रस्तावित माणदेश जिल्ह्याचे केंद्र करावे, अशी प्रार्थनाही डाळिंबाची आरास करत आपण सिध्दीविनायकांकडे केल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी ’तरूण भारत संवाद’शी बोलताना दिली.








