अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, भक्ताने मला काहीही दिले तरी आवडते. अगदी पत्र, पुष्प, फळ किमानपक्षी पाणी जरी दिलं तरी मला आनंद होतो. म्हणून भक्ताने तो जी जी कृती करतो ती ती मला अर्पण करावी त्यामुळे त्याचे कर्मबंधन तुटून तो मला येऊन मिळतो. प्रत्येक कृती करून माझ्या चरणी अर्पण करण्यातच माणसाचे भले आहे कारण त्यामुळे अनायासे माझी भक्ती केल्यासारखे होते. माझा अनन्य भक्त जीवनात जे जे करतो ते ते सर्व निरपेक्षपणे मला अर्पण करतो. मग ते चांगले आहे का वाईट आहे हेही तो पहात बसत नाही. त्याला हे माहित असतं की, कोणतीही गोष्ट करून मला अर्पण केली की, ती माझी सर्वश्रेष्ठ भक्ती होते. त्यामुळे त्याने मला काहीही अर्पण केले तरी मला ते आवडते. उदाहरणार्थ शिमग्याच्या महासणात जे खेळ खेळतात ते सहसा इतरवेळी खेळण्यासारखे नसतात कारण ते बहुधा त्याज्य असतात, असे त्याज्य खेळ खेळून, ते मला अर्पण केले तर तीही माझी भक्तीच होते. उद्धवा, माझी भक्ती करण्यातलं रहस्य हेच आहे की, माणूस जी जी कृती करेल ती ती त्यानं मला अर्पण करावी. मग ती शुभ असो वा अशुभ! उदाहरणार्थ चोराने चोरी करून ते धन मला मनापासून अर्पण केले तर त्याची ती कृतीही माझी भक्ती ह्या सदरात मोडते. आणखीन काय सांगू? भक्ताकडे एखादा नसलेला पदार्थ ब्रह्मार्पण म्हणून त्याने मला अर्पण केली तर तेही माझ्या भक्तीच्या खात्यात जमा होते. मुळातच हे सर्व मी निर्मित केलेलं असल्याने ते माझे आहे हे लक्षात ठेऊन ते मला अर्पण करणे ह्याला फार महत्व आहे. ह्यातूनच जी वस्तू आपली नाही तिला हातसुद्धा लावायचा नाही ह्या सद्गुणाची जोपासना अशा विचारसरणीतून होते. अगदी एखाद्याने कुणीही तोंड लावणार नाही असा एखादा खाण्याचा पदार्थ उदाहरणार्थ माणसाच्या विष्ठेलासुद्धा तोंड लावणारी कुत्री किंवा डुकरे कडू भोपळ्याची खीर उष्टावतसुद्धा नाहीत. अशी कडू भोपळ्याची खीर कुणी उल्हासाने कृष्णार्पण म्हणून मला अर्पण केली तर तीही ब्रह्मार्पण होते. एव्हढेच काय, समज एखादी वस्तू हरवली, आता ती पुन्हा कधीही दृष्टीला पडणार नाही असे लक्षात आल्यावर त्याने ती मला दिली असे समजले तर ती अनायासे मला अर्पण केल्यासारखे होते. उद्धवा आता तुझ्या लक्षात आले असेलच की, भक्ताने केलेली प्रत्येक कृती त्याने मला अर्पण करण्यातच त्याचे भले आहे. आता तुझ्यासारख्या माझ्यावर निस्सीम भक्ती असलेल्या भक्ताला असे वाटेल की, त्यात काय विशेष! ही तर चुटकीसरशी करतायेण्यासारखी गोष्ट आहे. पण तुला वाटतंय तेव्हढं हे बिलकुल सोपं नसतं कारण मायेच्या आवरणात गुंडाळली गेलेली माणसाची बुद्धी त्याच्याकडे असलेल्या गोष्टीतला कणभरसुद्धा दुसऱ्याला द्यायला तयार होत नाही अगदी मलासुद्धा. माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच अशी प्रत्येकाची वृत्ती असते. त्यांचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. त्यांना मनातून तर विषयांची आसक्ती म्हणजे तीव्र ओढ असते पण उगीच दाखवायचं म्हणून लोक मला अर्पण केलं असं उगीच उगीच म्हणत असतात. शर्कराखंड्खाद्यानी, दधी, क्षीर घृतानीच अशी मोठमोठी नावे घेऊन, मला कुजका दाणा अर्पण करायलाही ते मागेपुढे पहात नाहीत. उद्धव तुला ठकवणे म्हणजे काय ते माहित असेलच. ठक हा नेहमी सांगून सावरून तुम्हाला फसवत असतो. त्याप्रमाणे ओठात एक आणि पोटात एक असलेल्या मंडळीना असं वाटत असतं की आपण देवाला ठकवलं पण त्यातून त्यांचच नुकसान होत असल्याने, प्रत्यक्षात ते स्वत:लाच ठकवत असतात. त्यातील काही बुद्धिमान मंडळीना स्वत:च्या बुद्धीच्या जोरावर आपण विषयांची प्राप्ती करून घेतली असे वाटत असते. प्रत्यक्षात हे त्यांना मीच दिलेले असते. हे त्यांच्या लक्षात न घेता मी कर्ता आहे ह्या समजुतीतून त्यांनी देहाचे चोचले पुरवण्यासाठी केलेले असते.
क्रमश:








