एसजीपीडीए किरकोळ मासळी बाजारातील विक्रेत्यांची भूमिका, विक्रेत्यांनी 1 लाखाचे वीजबिल भरल्यानंतर मार्केटातील वीजपुरवठा सुरळीत
प्रतिनिधी / मडगाव
एसजीपीडीए किरकोळ मासळी बाजाराच्या देखभालीसाठी वाढीव सोपो देण्याची तयारी बाजारातील मासेविक्रेत्यांनी दाखविली आहे, तथापि, प्राधिकरणाने बाजाराची नीट देखभाल करून स्वच्छता राखावी. याशिवाय पाणी आणि विजेची सोय करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. विक्रेत्यांनी एक लाख ऊपयांचे वीजबिल भरल्यानंतर सोमवारी एसजीपीडीए किरकोळ मासळी मार्केटचा खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
मासळीविक्रेत्या बोस्त्यान यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मासळी विक्रेत्यांचा एसजीपीडीएला 50 ऊपये सोपो कर देण्यास विरोध नाही. परंतु एसजीपीडीए विक्रेत्यांना बाजाराच्या स्वच्छतेबरोबरच पाणी आणि वीज देण्यास तयार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एसजीपीडीएने काढून टाकलेले विक्रेत्यांचे वैयक्तिक वीज मीटर पूर्ववत बसवावेत, अशी मागणीही त्यांनी केली. दुबईतील मासळी बाजाराच्या धर्तीवर तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या या मासळी बाजाराच्या नूतनीकरणादरम्यान वीज मीटर काढण्यात आले होते. प्राधिकरणाने विक्रेत्यांना वैयक्तिक कनेक्शने पूर्ववत बहाल करावीत, अशी मागणी त्यांनी केली केली आहे.
मडगावातील किरकोळ मासळी मार्केटमधील समस्या जाणून घेण्यासाठी दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे (एसजीपीडीए) अध्यक्ष असलेले आमदार दाजी साळकर यांनी मागील शुक्रवारी अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. येत्या आठवड्यात मडगाव आणि फातोर्डाच्या आमदारांसह संबंधितांची बैठक घेऊन या समस्यांवर तोडगा काढणार असल्याचे साळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यांनी किरकोळ मासळी मार्केटच्या देखभालीचा खर्च वाढत चालला असल्याने मासेविक्रेत्यांना जरा जास्त सोपो कर भरण्याचे यावेळी आवाहन केले होते. त्याअनुषंगाने विक्रेत्यांनी वरील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
या भेटीवेळी काही मासेविक्रेत्या महिलांनी बिले न फेडल्याने वीजबत्ती सकाळपासून नसल्याची कैफियत साळकर यांच्यासमोर मांडली होती. पूर्वी आम्ही वीजबिलाचे पैसे देत होतो, पण या मार्केटचे सुशोभिकरण केल्यानंतर येथील वीज मीटर काढण्यात आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. यासंदर्भात प्राधिकरणाचे अध्यक्ष साळकर यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले होते की, पावसाळ्यात वीजपुरवठा वरचेवर खंडित होत असतो. त्याचाच हा भाग असावा. जाणूनबुजून कोणी वीजपुरवठा बंद केलेला नाही.









