पुणे / वार्ताहर :
पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या एका तरुणीने तिच्यासोबत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीला तिच्या मित्रांसोबत मैत्री करण्यासाठी जबरदस्ती केली. मात्र, संबंधित मैत्रिणीने मैत्री करण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणीने मैत्रिणीचे रूमवर काढलेले अर्धनग्न फोटो तिच्या मित्रांना पाठवून ते व्हायरल करत तिची बदनामी केली. याप्रकरणी 23 वर्षीय पीडित तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार सृष्टी, दीपक गोरे, आदित्य लोणकर, विशाल ढोकणे (सर्व रा. अहमदनगर) तसेच अनोळखी इंस्टाग्राम अकाउंटधारक व अनोळखी जीमेल धारक यांच्या विरोधात पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकार 4 डिसेंबर 2022 ते 25 जून 2023 यादरम्यान कोथरूड या ठिकाणी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही तिची मैत्रीण सृष्टी हिच्यासोबत एकत्र फ्लॅटमध्ये राहत होती. त्यांच्या फ्लॅटवर अधून मधून सृष्टीचे मित्र दीपक गोरे, आदित्य लोणकर, विशाल ढोकणे हे येत होते. सृष्टी तक्रारदार तरुणीला तिच्या मित्रांसोबत मैत्री करण्यास जबरदस्ती करत होती. मात्र, तरुणीने या मित्रांसोबत मैत्री करण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारदार तरुणी व सृष्टी यांच्यात वाद होत होते. या वादाचा राग मनात धरून पीडित तरुणीचे रूमवर काढलेले खासगी अर्धनग्न फोटो तिच्या मित्रांपैकी एकाला तिने पाठवले. ते फोटो तरुणीच्या परवानगीशिवाय तरुणी व तिच्या कुटुंबीय मित्र परिवारांमध्ये वेगवेगळय़ा फेक इंस्टाग्राम अकाउंटमध्ये वेळोवेळी प्रसारित करून तिची बदनामी करण्यात आली. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तपास करत आहेत.