शिरोळ / प्रतिनिधी : परिसरातील एका अल्पवयीन मुलीस वारंवार छेडछाड करून मानसिक छळ केल्याप्रकरणी संशयित आरोपी अवधूत अनिल कोळी (वय 22, रा शिरोळ ) याच्या विरोधात पीडित मुलीच्या आईने बुधवारी रात्री उशिरा पोक्सो अंतर्गत शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी गुरुवारी चार वाजण्याच्या सुमारास अवधूत कोळी याची चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले. चौकशी करीत असताना त्याने लघुशंकेचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. संशयित आरोपी कोळी यास पकडण्यासाठी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, गेल्या दोन वर्षापासून अवधूत कोळी हा मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिला वारंवार त्रास देत होता. वारंवार तिचा पाठलाग करायचा. गाडीचा जोरदार हॉर्न वाजवून तिला त्रास द्यायचा. संबंधित मुलीने त्यास जाब विचारला असता संशयित आरोपी अवधूत कोळी याने ,माझं तुझ्यावर प्रेम आहे ,मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुला जिवंत सोडणार, नाही अशी वारंवार धमकी देत असे. याबाबत मुलीच्या वडिलांनी कोळी यास जाब विचारला असता , मी तुझ्या पोरगीला पळवून नेणार आहे, कोण माझे काय करतो, माझ्याशी लग्न न केल्यास मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेणार अशी धमकी दिली असल्याची फिर्याद मुलीच्या आईने बुधवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात अवधूत कोळी विरोधात दिली.
ठाण्यात अवधूत कोळी यांच्या विरोधात पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी अवधूत कोळी यास शिरोळ पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी सुरू केली असता लघुशंकेचा बहाना करून त्याने पोलीस ठाण्यातून पलायन केले. पोलिसांनी पाठलाग केला मात्र तो सापडला नाही. ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. संशयित आरोपी अवधूत कोळी याच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना करण्यात आले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यास पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय विश्वास कुरणे ,गजानन कोष्टी, सागर पाटील हे करीत आहेत.