फाईल गायब प्रकरण
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नोटिसीला उत्तर दिल्याच्या कारणावरून खडाजंगी झाली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. नोटिसीला उत्तर दिलेली फाईलच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर सभागृहाचे प्रभारी कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरपंचायत संचनालयाने महापालिकेला कर वाढविला नाही म्हणून नोटीस दिली होती. त्या नोटिसीला महापालिकेतर्फे उत्तर देण्यात आले. त्या नोटिसीवर चुकीच्या तारखेचा उल्लेख करण्यात आला. यावरून शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. दुपारनंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी सभागृहात दाखल झाले. त्यांनी या नोटिसीच्या उत्तरावरून राजकारण करू नका, असे सुनावले. मात्र सत्ताधारी गटाने महापालिका आयुक्तांवर आरोप करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
नोटिसीला उत्तर देण्यात आलेल्या या कागदपत्रांवर महापौर शोभा सोमणाचे यांचीही स्वाक्षरी होती. याबाबतची झेरॉक्स प्रती विरोधी गटाच्या नगरसेवकांकडे उपलब्ध होते. मात्र, मुख्य फाईलच चोरीला गेली. यामुळे सतीश जारकीहोळी यांनी ही फाईल कशी गायब झाली, याची चौकशी केली. त्यावेळी प्रभारी कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांच्याकडूनच ही फाईल चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर रात्री पुन्हा याबाबत चौकशी करण्यासाठी पालकमंत्री खुद्द महापालिकेमध्ये आले. त्यांनी आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांना बोलावून घेऊन याबाबत एफआयआर दाखल करून घेण्याची सूचना केली. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. यामुळे महापालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे.









