अहमदाबादमध्ये नुकत्याच झालेल्या 11 व्या आशियाई जलतरण स्पर्धेत चीननं पुन्हा आपलं वर्चस्व दाखवून देताना तब्बल 49 पदकांनिशी (38 सुवर्ण, 8 रौप्य व 3 कांस्य) एकंदरित विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं…मात्र या स्पर्धेत खरी थक्क करणारी कामगिरी राहिली ती भारताची अन् त्याचा नायक राहिला तो श्रीहरी नटराज…
- सहसा जलतरणात भारताचं नाव कधीच झळाळून उठलेलं दिसत नाही. पण आशियाई जलतरण स्पर्धेत आपण तब्बल 13 पदकं कमावली. त्यात 4 रौप्य नि 9 कांस्यपदकांचा समावेश. त्यामुळं आपल्या वाट्याला आलं ते नववं स्थान. देशाची ही आतापर्यंतची सर्वांत यशस्वी आशियाई मोहीम अन् त्यात मोठा वाटा उचलला तो कर्नाटकचा जलतरणपटू श्रीहरी नटराजनं…
- श्रीहरी नटराजनं या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले, 16 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणला आणि वैयक्तिक फ्रीस्टाइल स्पर्धांसह सात पदकं खिशात घातली…त्याचा आत्मविश्वास इतका वाढलाय की, त्यानं आता जपानमधील आशियाई क्रीडास्पर्धा व ग्लासगोमधील राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये पदक जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय…
- प्रशिक्षणातील काही बदल, आशियाई स्पर्धेपूर्वी अहमदाबादमध्ये केलेली तयारी आणि तंत्रज्ञानावर आधारित डेटा सोल्युशन्स कंपनी ‘स्विम्पल’मध्ये स्वत:ला झोकून देणं या सर्वांनी नटराजला पहिली मोठी आंतरराष्ट्रीय पदकं जिंकण्याच्या बाबतीत हातभार लावलाय…
- तो आता स्वत:कडे ‘बॅकस्ट्रोक’ तज्ञ म्हणून पाहत नाही. त्याचा भर अजूनही ‘बॅकस्ट्रोक’वर असला, तरी ‘फ्रीस्टाइल’ प्रकारात प्रयोग करण्यात त्याला खूप मजा येऊ लागलीय…‘मी प्रशिक्षणाची पद्धत बदललीय. मी बॅकस्ट्रोकमधून फ्रीस्टाइलमध्ये गेलोय. ते पडताळून पाहणं मजेदार वाटतंय’, तो सांगतो…
- स्पर्धेच्या पहिल्या दिवशी या 24 वर्षीय खेळाडूनं दुसरं स्थान मिळवून भारताचं खातं उघडलं ते 200 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत. या स्पर्धेत 16 वर्षांनी भारताला मिळालेलं ते पहिलं पदक होतं…त्यानंतर त्यानं 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य नि पुरुषांच्या 4×100 मीटर मेडलेमध्ये कांस्य, 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये कांस्य, 4×200 मीटर फ्रीस्टाइल रिले प्रकारात राष्ट्रीय विक्रमासह रौप्य पटकावलं अन् शेवटच्या दिवशी त्यात भर टाकली ती 100 मीटर बॅकस्ट्रोकमधील कांस्य नि 4×100 मीटर फ्रीस्टाइल रिलेमधील आणखी एका कांस्यपदकाची…
- पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडास्पर्धेत 50, 100 आणि 200 मीटर बॅकस्ट्रोक तसंच 100 व 200 मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत उतरण्याचा त्याचा मानस आहे…
- श्रीहरीनं वैयक्तिक पदकांच्या आघाडीवर बजावलेला पराक्रम ही या स्पर्धेच्या इतिहासात एखाद्या भारतीयानं केलेली सर्वोत्तम कामगिरी. पदकांचा विचार करता तो यंदाच्या स्पर्धेत पुऊष जलतरणपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याच्यापेक्षा जास्त आठ पदकं (सर्व सुवर्ण) जिंकली ती चीनच्या झेनकी गोंगनं…
- टोकियो, 2020 आणि पॅरिस 2024 अशा दोन ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलेल्या श्रीहरी नटराजनं साजन प्रकाशप्रमाणं टोकियो ऑलिंपिकसाठी थेट पात्रता मिळवली होती. अशी कामगिरी त्यापूर्वी कोणत्याही भारतीय जलतरणपटूला करता आली नव्हती…
- त्याच्या नावावर आठ राष्ट्रीय विक्रम असून त्यापैकी तीन वैयक्तिक. एखाद्या भारतीय जलतणपटूचा विचार करता हे प्रमाण सर्वाधिक. श्रीहरी नटराजच्या खात्यात आहेत ते 100 मीटर बॅकस्ट्रोकसह दोन फ्रीस्टाइल श्रेणींमधील (100 मीटर व 200 मीटर) पुऊषांचे राष्ट्रीय विक्रम…
– राजू प्रभू









