बुद्धिबळ विश्वचषक…या खेळाच्या प्रमुख स्पर्धांपैकी एक…कँडिडेट स्पर्धेतील स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा मार्ग. त्यामुळं ती वर्षातील सर्वांत महत्त्वाच्या स्पर्धांपैकी एक बनलीय…
- बुद्धिबळ विश्वचषक ही ‘फिडे’ या नियामक मंडळाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या प्रमुख बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक…ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि स्पर्धेतील तीन अव्वल खेळाडू कँडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरतात. ‘कँडिडेट’ ही वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या लढतीसाठीची पात्रता स्पर्धा…
- काही खेळांमध्ये विश्वचषक ही सर्वांत मोठी स्पर्धा असते. पण बुद्धिबळात तसं नाही. विश्वचषक ही ‘कँडिडेट’ आणि ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’पेक्षा खालच्या स्तरावरील स्पर्धा. असं असलं, तरी तिचं महत्त्व कमी ठरत नाहीये…
- आता बुद्धिबळ विश्वचषकाचं स्वरूप टेनिसच्या धर्तीवर तयार करण्यात आलंय. त्याअंतर्गत एका फेरीत बाद होण्याची प्रक्रिया अवलंबविली जाते. परंतु सध्याचा बुद्धिबळ विश्वचषक हा त्याच्या पूर्वीच्या स्पर्धांपेक्षा वेगळा…
- 2000 मध्ये जेव्हा या स्पर्धेची संकल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली तेव्हा त्याचं स्वरूप वेगळं होतं. 24 खेळाडूंना सहा जणांच्या चार गटांमध्ये विभागण्यात यायचं आणि प्रत्येक खेळाडू त्याच्या गटातील इतर प्रतिस्पर्ध्यांशी भिडायचा. मग दरेका गटातील अव्वल दोन खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत पोहोचायचे, जिथं ते प्रत्येकी दोन सामने खेळायचे. जर दोन्ही सामन्यांमध्ये बरोबरी झाली, तर ‘रॅपिड टायब्रेकर’ खेळवला जायचा. 2000 व 2002 मध्ये बुद्धिबळ विश्वचषकाचं स्वरूप होतं ते असं. परंतु 2005 साली जेव्हा ही स्पर्धा खांटी-मानसिस्क इथं खेळविण्यात आली तेव्हा सर्व काही बदललं…
- 2005 ते 2019 पर्यंत बुद्धिबळ विश्वचषक ही 128 खेळाडूंचा समावेश असलेली एका फेरीत बाद करणारी स्पर्धा राहिली तसंच जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या पात्रतेचा भाग बनली…
- 2021 च्या स्पर्धेपासून खेळाडूंची संख्या 206 पर्यंत वाढली. पहिल्या फेरीत ‘पुढे चाल’ची पद्धत वापरण्यात येऊ लागली. दुसऱ्या फेरीपासून मात्र स्वरूप मागील स्पर्धांसारखंच राहिलंय…
- महान विश्वनाथन आनंदनं 2000 नि 2002 अशी दोनदा ही स्पर्धा जिंकली. त्यापैकी 2002 मध्ये विश्वचषक रंगला होता तो हैदराबादमध्ये. त्यात 24 खेळाडूंचा सहभाग राहिला होता अन् आनंदनं मायदेशात विश्वचषक खात्यात जमा करण्यात यश मिळविलं होतं…
- पाच वेळचा विश्वविजेता आणि एका दशकाहून अधिक काळ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर राज्य गाजविणाऱ्या महान मॅग्नस कार्लसनला हुलकावणी देणारा विश्वचषक जिंकण्यासाठी 2023 साल उजाडावं लागलं. यावरून ही स्पर्धा किती खडतर नि चुरशीची असते ते लक्षात यावं…
- तज्ञांच्या मते, बुद्धिबळात बाद पद्धतीनं होणाऱ्या फारशा स्पर्धा नाहीत अन् विश्वचषक ही खूप जास्त ताणतणाव असलेल्या स्पर्धांपैकी एक…इतर बहुतेक स्पर्धांमध्ये जर चूक केली आणि सामना गमावला, तरी पुनरागमन करण्याची नेहमीच संधी राहते. कारण त्या साखळी पद्धतीनं खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धा असतात. विश्वचषकात मात्र तसं घडू शकत नाही, त्यामुळं तिथं चुकांना वाव खूपच कमी…
- यंदाच्या स्पर्धेत अनुपस्थिती जाणवेल ती गेल्या वेळी विश्वचषक जिंकणारा मॅग्नस कार्लसन, फाबियानो काऊआना, हिकारू नाकामुरा, अलिरेझा फिरोजा, डिंग लिरेन आणि जॅन-क्रिझिस्टोफ दुदा यांसारख्या अव्वल खेळाडूंची…
- यावेळच्या विश्वचषकासाठीची एकूण बक्षीस रक्कम 20 लाख डॉलर्स. त्यातून विजेत्याला मिळतील 1 लाख 20 हजार डॉलर्स, तर उपविजेत्याला 85 हजार डॉलर्स. तिसऱ्या नि चौथ्या क्रमांकावरील खेळाडूंना अनुक्रमे 60 हजार व 50 हजार डॉलर्स मिळतील…
– राजू प्रभू









