दक्षिण अमेरिकी पात्रता फेरीत पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून ब्राझीलनं 2026 च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आणि प्रशिक्षक या नात्यानं कार्लो अँसेलोटी यांना पहिल्या यशाची चव चाखता आली. त्यापूर्वी पदार्पणात त्यांना इक्वेडोरविऊद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावं लागलं होतं…ब्राझील ही खरं तर फुटबॉलची राजधानी. एकाहून एक चमकदार हिरे त्यात सदैव भरलेले. मग त्यांना विदेशी प्रशिक्षकाची गरज का भासावी ?…
- कार्लो अँसेलोटी यांनी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ती बनली आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहासातील सर्वांत लक्षवेधी नियुक्तींपैकी एक…ब्राझीलला विदेशी प्रशिक्षक, तोही युरोपमधील उच्चभ्रूंपैकी एक, आणावा लागावा यातून त्यांची हताश परिस्थिती आणि संघर्ष दिसून येतो…
- हे पाऊल उचलावं लागण्यामागचं कारण म्हणजे गेल्या दोन दशकांत ब्राझीलच्या फुटबॉलमधील वर्चस्वाला ओहोटी लागलीय. यादरम्यान 2007 आणि 2019 अशी दोनदा त्यांनी कोपा अमेरिका जेतेपदं पटकावलेली असली, तरी विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक राहिलीय…
- 2002 मध्ये पाचव्यांदा जिंकल्यानंतर त्यांना विश्वषषक मिळविता आलेला नाही आणि अलीकडे ते ज्या प्रकारे विश्वचषक स्पर्धांतून बाहेर पडलेत त्यातून या घसरगुंडीचे स्पष्ट संकेत मिळतात…यापैकी सर्वांत निराशाजनक घटना 2014 मध्ये पाहायला मिळाली. त्यावेळी विश्वचषक स्पर्धेचे यजमान असूनही ब्राझीलला उपांत्य फेरीत जर्मनीकडून 1-7 असा नामुष्की आणणारा पराभव पत्करावा लागला.
- 2018 च्या उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमसमोर ब्राझीलला नमते घ्यावे लागले, तर उपांत्यपूर्व फेरीतच क्रोएशियाकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव झाल्याने 2022 चा चषक जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या…2002 पासूनची ब्राझीलची प्रत्येक मोहीम बाद फेरीत युरोपियन संघाविऊद्ध संपुष्टात आलीय…
- संघाच्या या गोंधळादरम्यान प्रशिक्षक आले नि गेले…टिटे यांनी कतारमधील 2022 च्या स्पर्धेनंतर ठरविल्याप्रमाणं सोडचिठ्ठी दिली…ब्राझीलची विश्वचषक पात्रता मोहीमही काही कमी अडथळ्यांची राहिलेली नाही. अर्जेंटिनाविऊद्ध 1-4 असा अपमानजनक पराभव त्यांना सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षक डोरिवल ज्युनियर यांची हकालपट्टी केली. मग ब्राझिलियन फुटबॉल महासंघानं खूप दिवसांपासून मनात असलेली एक धाडसी योजना आखली ती ‘रेयाल माद्रिद’चे 65 वर्षीय इटालियन प्रशिक्षक अँसेलोटी यांना आणण्याची…
- ही नियुक्ती विशेष आहे, कारण ब्राझीलच्या फुटबॉल महासंघानं परदेशी प्रशिक्षकावर विश्वास ठेवणं नेहमीच टाळलंय…फक्त तीन बिगरब्राझिलियन व्यक्तींनी आतापर्यंत संघाला मार्गदर्शन केलंय आणि त्यांनी जबाबदारी पेलली ती फक्त सात सामन्यांत…
- अँसेलोटी हे प्रशिक्षकपद भूषविणारे पहिले युरोपियन. त्यांच्या खात्यात पाच चॅम्पियन्स लीग जेतेपदं आणि इटली, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन व जर्मनीमधील स्पर्धांतील यश असल्यानं ब्राझीलला त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा असतील…
- जरी रेयाल माद्रिदला 2024-25 चा हंगाम कठीण जाऊन कोपा डेल रेच्या अंतिम फेरीत बार्सिलोनाकडून अन् चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत आर्सेनलकडून पराभूत व्हावं लागलेलं असलं, तरी अँसेलोटी यांची मागील कामगिरी नजरेआड करता येणार नाही…
– राजू प्रभू









