भारतात दोन वर्षींपूर्वी झाली होती ती पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा. त्यात यजमान संघानं अंतिम फेरीत धडक मारताना कशी जबरदस्त कामगिरी बजावली आणि शेवटी ऑस्ट्रेलियापुढं त्यांना कसं नमतं घ्यावं लागलं याच्या आठवणी क्रिकेट रसिकांच्या मनात अजूनही ताज्या असतील…आता भारतात आणखी एक विश्वचषक रंगणार…यावेळी स्पर्धा आहे ती महिलांची. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचा हा 13 वा हंगाम उंबरठ्यावर पोहोचलाय. स्पर्धा 30 सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना रंगेल तो 2 नोव्हेंबर रोजी…
- ऑस्ट्रेलिया हा महिला विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी संघ. त्यांनी सात वेळा हा प्रतिष्ठेचा चषक जिंकलाय, तर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडनं चार वेळा…
- या स्पर्धेचं जेतेपद मिळवू शकलेला त्यांच्याव्यतिरिक्त एकमेव संघ म्हणजे न्यूझीलंड. त्यांनी हे यश मिळविलं 2000 साली…बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांना या चषकाला खात्यात जमा करण्याचं भाग्य अजून लाभलेलं नाहीये…
- जगभरातील आठ सर्वोत्तम महिला संघ या स्पर्धेत उतरलेत…महिला विश्वचषकात कोणतेही गट पाडण्यात आलेले नाहीत. सर्व संघांना गट टप्प्यात सात सामने खेळावे लागतील आणि त्यानंतर क्रमवारीतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील…
- ? गट टप्प्यात सर्वोच्च क्रमांकावर राहिलेला संघ चौथ्या क्रमांकावरील संघाशी खेळेल, तर अन्य सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांमध्ये होईल. त्यानंतर दोन्ही लढतींतील विजेत्यांमध्ये 2 नोव्हेंबर चषक पटकावण्यासाठी झुंजतील…
- भारतात एकूण चार ठिकाणी सामने होतील, ज्यामध्ये एसीए स्टेडियम (गुवाहाटी), होळकर स्टेडियम (इंदूर), एसीए-व्हीडीसीए स्टेडियम (विशाखापट्टणम) आणि डी. वाय. पाटील स्टेडियम (नवी मुंबई) यांचा समावेश…
- कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियम हे श्रीलंकेतील एकमेव ठिकाण जे या स्पर्धेदरम्यान वापरलं जाईल आणि नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमप्रमाणं ते अंतिम सामन्यासाठी वापरलं जाऊ शकतं…
- भारत हा या स्पर्धेचा खरं तर एकमेव यजमान. तरीही श्रीलंकेत सामने ठेवण्यामागील कारण दडलंय ते भारत-पाकिस्तान तणावात…यंदाच्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी), भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांनी एक करार केला होता. त्यानुसार भारत नि पाकिस्तान 2027 पर्यंत दोन्ही देशांनी यजमानपद भूषविलेल्या जागतिक स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी एकमेकांच्या भूमीत जाणार नाहीत अन् त्यासाठी हायब्रिड मॉडेलचा पर्याय वापरण्यात येईल…
- वरील घडामोडीनुसार पाकिस्ताननं आयोजित केलेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील सर्व सामने भारत दुबईमध्ये खेळला…त्याच धर्तीवर पाकिस्तान महिला विश्वचषकातील त्यांचे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळेल. 5 ऑक्टोबर रोजी भारत व पाकिस्तान यांच्यात होणार असलेला सामना देखील श्रीलंकेत होईल. जर दोन्ही देश पात्र ठरले, तर उपांत्य नि अंतिम सामनाही प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळविला होईल. मात्र पाकिस्तान संघाची ताकद पाहता असं घडण्याची शक्यता कमीच…
- गट टप्प्यात एकूण 28 सामने खेळवले जातील. सर्व सामने स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वा. सुरू होतील. अपवाद फक्त 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील लढतीचा. ती स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वा. सुरू होईल.
- पहिला उपांत्य सामना 29 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी किंवा कोलंबो इथं, तर दुसरा 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होईल…
– राजू प्रभू









