‘फिफा क्लब वर्ल्ड कप’..अनेकांना हे नाव ऐकून ही नवीनच स्पर्धा आहे की काय असं वाटलं असेल. कारण लोकांना माहीत आहे ती विविध राष्ट्रांचे संघ सहभागी होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची…प्रत्यक्षात ही स्पर्धा नवीन नसली, तरी या स्पर्धेचं स्वरुप मात्र नवं आहे…सध्या फुटबॉल शौकिनांचं सारं लक्ष ज्याच्यावर खिळून राहिलंय त्या या स्पर्धेविषयी…
- एक नवीन चषक, एक नवीन स्वरूप असं फिफा क्लब वर्ल्ड कपचं वर्णन करता येईल. प्रत्येक भागातले नामवंत क्लब त्यात उतरलेत अन् त्यातून एका क्लबला मिळेल ती जगज्जेतेपदाचा मुकुट परिधान करण्याची संधी…
- स्पर्धेत उतरलेल्यांमध्ये समावेश आहे तो ‘युएफा चॅम्पियन्स लीग’ विजेता फ्रान्सचा पॅरिस सेंट-जर्मेन, कॉनमेबोल कोपा लिबर्टाडोरेस जिंकणारा ब्राझीलचा बोटाफोगो आणि गेल्या चारपैकी तीन ‘सीएएफ चॅम्पियन्स लीग’ची विजेतेपदं पटकावणारा इजिप्तचा अल अहली आदी दिग्गज संघांचा…
- क्लब वर्ल्ड कप ही जगभरातील 32 सर्वांत यशस्वी फुटबॉल क्लबांची एक स्पर्धा. राष्ट्रीय संघांमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकाच्या धर्तीवरच ती आयोजित करण्यात आलीय. आपापल्या खंडातील प्रतिष्ठेचा चषक जिंकलेले किंवा आपापल्या क्षेत्रातील महत्त्वाच्या स्पर्धांत चांगली कामगिरी केलेले क्लब या स्पर्धेसाठी पात्र ठरलेत…
- फिफा क्लब वर्ल्ड कप हा अमेरिकेत 14 जूनपासून सुरू झाला असून 13 जुलैपर्यंत ही स्पर्धा चालेल…त्या देशातील 11 शहरांमधील 12 स्टेडियम्सवर त्याचं आयोजन करण्यात आलंय. लायोनेल मेस्सीचा इंटर मियामी व विक्रमी वेळा आफ्रिकी विजेता बनलेला अल अहली यांच्यातील सामन्यानं त्याची सुरुवात झाली…
- स्पर्धेचा अंतिम सामना 13 जुलै रोजी न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियममध्ये होईल. 2026 च्या फिफा पुऊष विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना देखील खेळविला जाईल तो याच ठिकाणी…
- ही स्पर्धा नवी नव्हे. पण या स्पर्धेत पूर्वी फक्त सात संघांचा म्हणजे जगभरातील प्रत्येक खंडिय स्पर्धेतील विजेत्याचा समावेश राहायचा. इंटरकॉन्टिनेंटल कपसाठी देखील तेच स्वरूप वापरण्यात आलंय. त्याची पहिली स्पर्धा 2024 मध्ये होऊन त्यात सरशी झाली ती रेयाल माद्रिदची…
- फिफा विश्वचषक स्पर्धेत 1998 पासून 2022 पर्यंत चार संघांचे आठ गट राहिले. त्याच पद्धतीनं आठ गट या क्लब वर्ल्ड कपमध्येही पाडण्यात आलेत…प्रत्येक गटातील चार संघ गट टप्प्यात एकमेकांशी एकदा खेळलेत. त्यातील अव्वल दोन संघ बाद फेरीत प्रवेश करणार असून या बाद फेरीची सुरुवात होईल ती उपउपांत्यपूर्व टप्प्यापासून…
- आतापर्यंत एसई पाल्मिरास, इंटर मियामी, पॅरिस सेंट-जर्मेन, बोटाफोगो, फ्लेमेन्गो, चेल्सी, बायर्न म्युनिक, बेनफिका, युवेंतस, मँचेस्टर सिटी हे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरलेत…
- यात युरोपचे (त्यांचं कॉन्फेडरेशन ‘यूएफा’) सर्वाधिक संघ सहभागी झाले असून त्यांची संख्या आहे 12. त्यानंतर सहा संघांनिशी क्रमांक लागला आहे तो दक्षिण अमेरिकेचा (कॉन्मेबोल)…आशिया (एएफसी), आफ्रिका (सीएएफ) आणि उत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियन (कॉन्काकाफ) यामधून प्रत्येकी चार संघ, तर ओशनियामधून (ओएफसी) एक संघ सहभागी झालाय. यजमान देशाच्या स्थानिक विजेत्यांना एक स्थान देण्यात आलंय…
– राजू प्रभू









