एकदिवसीय सामन्यांमध्ये सध्याच्या घडीला एका डावात दोन नवीन चेंडूंचा वापर आळीपाळीनं केला जातो. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या नियमात बदल करण्याचा विचार करू लागलीय…‘वनडे’मध्ये फलंदाजी व गोलंदाजीत काही प्रमाणात संतुलन आणण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्याचा बेत चाललाय…यासंदर्भात कसली शिफारस करण्यात आलीय आणि नवीन बदल कसा राहू शकतो त्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप…
- नुकत्याच झिम्बाब्वेतील हरारे इथं झालेल्या ‘आयसीसी’च्या बैठकीत एकदिवसीय सामन्याच्या एक डावात 35 व्या षटकापासून फक्त एकच चेंडू वापरण्याची शिफारस करण्यात आलीय…
- माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील आयसीसी पुऊष क्रिकेट समितीनं संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात शिफारस केली होती…यापुढंही प्रत्येक डाव आताप्रमाणं दोन नवीन चेंडूंनिशीच सुरू होईल… ? परंतु नवीन शिफारसीनुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 34 व्या षटकानंतर कोणता चेंडू वापरायचा हे ठरविण्याची परवानगी असेल. त्यावेळी दोन्ही चेंडू 17 षटकं इतके जुने झालेले असतील. दुसरा चेंडू अतिरिक्त म्हणून गरजेप्रसंगी वपरण्यासाठी ठेवला जाईल…
- क्रिकेट समितीनं बऱ्याच आधी म्हणजे 25 षटकांनंतर चेंडू बदलण्याची बाब विचारात घेतली होती. परंतु समोर येत असलेल्या माहितीनुसार, समितीमध्ये त्याला फारसं पाठबळ मिळालं नाही. प्रत्येकी 17 षटकं दोन्ही चेंडू वापरून् त्यानंतर कोणता चेंडू वापरायचा हे ठरविणं जास्त उचित ठरेल असं त्यांचं मत बनलं…
- या महिन्याच्या अखेरीस विविध क्रिकेट मंडळांनी या बदलावर त्यांचं मत देणं अपेक्षित आहे. जर एकमत झालं, तर जुलैमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल…कारण हा खेळण्याच्या परिस्थितीत बदल आहे, त्यामुळं त्याला ‘आयसीसी’ मंडळाच्या मंजुरीची आवश्यकता नाही…
- सध्याचा नियम ‘आयसीसी’नं ऑक्टोबर, 2011 मध्ये लागू केला होता. पण त्यापूर्वीही विविध वेळी त्याचा वापर झाला होता. उदाहरणार्थ 1992 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याचं दर्शन घडलं होतं…
- 2011 पर्यंत एकदिवसीय सामन्यातील एका डावात 34 व्या षटकानंतर चेंडू बदलणं अनिवार्य होतं. त्याच्या जागी त्याच प्रकारे वापरल्या गेलेला, पण अधिक स्वच्छ आणि पाहण्यास सोपा असा चेंडू वापरला जायचा. कारण पांढरे चेंडू मलिन झाल्यानंतर फलंदाजांना ओळखणं कठीण जातं असा तर्क त्यामागं होता…
- दोन नवीन चेंडू वापरण्याच्या निर्णयावर भरपूर टीका झालीय. त्यामुळं चेंडू पुरेसा जुना होत नाही आणि परिणामस्वरुप रिव्हर्स स्विंग खेळातून गायब झाल्याचा मुद्दा पुढं केला जातो…त्याशिवाय फिरकीपटूंनाही असा चेंडू पकडणं आणि वळविणं कठीण होतं. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं देखील यामुळं निर्माण होणाऱ्या असंतुलनाबद्दल चिंता व्यक्त केली होती…
- भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननं सुद्धा गेल्या महिन्यात नाराजी व्यक्त करताना प्रत्येक डावात दोन नवीन चेंडूंचा वापर आणि पाच क्षेत्ररक्षकांना वर्तुळाच्या आत ठेवण्याचं बंधन हे बदल फिरकी गोलंदाजीतील भारताच्या ऐतिहासिक वर्चस्वाला छेद देण्यासाठी लागू करण्यात आल्याचं वादग्रस्त मत व्यक्त केलं होतं…खेळावर याचा मोठा परिणाम होत असून ‘फिंगर स्पिन’ची भूमिका देखील कमी झालीय, याकडे त्यानं लक्ष वेधलं होतं…









