‘आयपीएल’सारख्या टी-20 लीगमध्ये केवळ षटकार नि चौकारांची बरसातच सामने जिंकून देत नाही, तर चपळाईनं पकडलेले अफलातून झेल नि थरारक ‘रन-आऊट’ सुद्धा लढतीचा रंग बदलू शकतात…मात्र यंदा क्षेत्ररक्षणाच्या आघाडीवर फारसं सुखद चित्र दिसलेलं नसून त्यावर टाकलेली ही नजर…
- यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये फटक्यांच्या आतषबाजीच्या जोडीला सोडले गेलेले झेलही वारंवार पाहायला मिळालेत. हंगामातील पहिल्या 40 सामन्यांमध्ये 111 झेल सोडले गेले. 2020 पासूनच्या स्पर्धांचा विचार करता हे प्रमाण सर्वाधिक…
- या हंगामातील लखनौ सुपर जायंट्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील 40 वा सामनाही वेगळा नव्हता…पहिल्या डावांमध्येच तीन झेल सोडले गेले. पहिले दोन झेल कठीण होते, परंतु 16 व्या षटकात ट्रिस्टन स्टब्सनं तुलनेनं सरळ झेल सोडून आयुष बदोनीला जीवदान दिले. त्यानंतर आयुषनं 20 व्या षटकात बाद होण्यापूर्वी आणखी 33 धावा जोडल्या…
- स्टब्सकडून या हंगामात सोडला गेलेला हा चौथा झेल. त्यामुळं या आघाडीवर त्याला खलील अहमदसह संयुक्तपणे अग्रस्थान प्राप्त झालंय. सुदैवानं त्याचा दिल्लीला फारसा फटका बसला नाही. कारण त्यांनी 160 धावांचं लक्ष्य आठ गडी आणि 13 चेंडू शिल्लक असताना सहज पार केलं. दुसऱ्या डावातही प्रिन्स यादवनं एक सोपा झेल सोडला. पण त्याला फारसं महत्त्व नव्हतं. कारण तोवर दिल्ली कॅपिटल्स लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचलं होतं…
- यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये झेल घेण्याची चारपैकी एक संधी वाया गेलीय. त्यामुळं झेल पकडण्याची सरासरी 75.2 टक्क्यांवर आलेली असून 2020 नंतरच्या आयपीएलमधील पहिल्या 40 सामन्यांचा विचार करता ती सर्वांत कमी…
- याशिवाय चुकीच्या थ्रोमुळं फलंदाजांना धावबाद करण्याची संधी 172 वेळा हुकलीय आणि 247 वेळा मिसफील्डिंग झालंय. हे दोन्ही आकडे 2024 मधील ‘आयपीएल’च्या याच टप्प्याशी तुलना करता दुप्पट…
- क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत मुंबई इंडियन्स हा आतापर्यंतचा सर्वोत्तम संघ ठरलाय. त्यांची झेल घेण्याची सरासरी 83.6 टक्के असून सर्वांत कमी मिसफिल्डिंग (14) नोंदविलंय ते त्यांनीच…
- फलंदाजांना धावबाद करण्याच्या बाबतीत मुंबईहून एक पाऊल पुढं राहिलाय तो दिल्ली कॅपिटल्सचा संघ. परंतु जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा मुंबईनंही लक्ष्य भेदून दाखविलंय. याचं विशेष उदाहरण म्हणजे एकाच षटकात तीन फलंदाजांना धावबाद करून त्यांनी दिल्लीमध्ये मिळविलेला रोमांचक विजय. त्यामुळं त्यांच्या मोहिमेची घसरेली गाडी रुळावर आली…
- खराब क्षेत्ररक्षणाचा सर्वाधिक फटका बसलाय तो यंदा मनासारखी कामगिरी न करता आलेल्या चेन्नई सुपर किंग्सना. त्यांनी झेल घेण्याच्या 16 संधी वाया घालविल्याहेत…आरसीबीबरोबरचा त्यांचा चेन्नईतील सामना हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण. 2008 नंतर पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरनं चिपॉकचा किल्ला सर करण्यात यश मिळविलं. त्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारनं 32 चेंडूंत 51 धावा काढून मोलाचा वाटा उचलला खरा. पण तीन वेळा त्याला जीवदान मिळालं…
- झेल सोडणं किती महागात पडू शकतं याचा आणखी एक जबरदस्त दाखला म्हणजे सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माची झंझावाती खेळी. पंजाब किंग्सविऊद्ध 55 चेंडूंत 141 धावा फटकावताना दोनदा त्याला जीवदान मिळालं…
- 2024 पासून ‘आयपीएल’मध्ये यष्टिचित करण्याच्या संधी फक्त दोनदाच हुकल्याहेत. त्यापैकी एक यंदा विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातील शेवटच्या षटकात लखनौचा कर्णधार रिषभ पंतनं घालविली…पंतनं आतापर्यंत तीन झेलही सोडलेत. यंदा एखाद्या यष्टिरक्षकानं सोडलेले हे सर्वाधिक झेल…









