लांब काठी घेऊन धावत यायचं आणि त्याच्या आधारे आडव्या बांधलेल्या पट्टीवरून उंच उडी मारायची हा ‘पोल व्होल्ट’चा प्रकार आपल्याला चांगलाच माहीत आहे. ऑलिम्पिकपासून आशियाई खेळांपर्यंत सर्वत्र तो आपण पाहिलाय…मात्र अशाच प्रकारे धावत यायचं अन् काठीच्या आधारे चक्क कालवा पार करून पल्याड उडी घ्यायची हा प्रकार माहीत आहे का ?…नेदरलँड्सच्या भूमीतील हा सर्वांत जुना क्रीडाप्रकार काही कमी आव्हानात्मक नाही…
- ‘फियर्लजेपेन’ या डच खेळाचा हा थरार…नेदरलँड्सच्या ग्रामीण भागांमध्ये तो पाहायला मिळतो. यात खेळाडू धावत येऊन पाण्यात असलेल्या पातळ कार्बन काठीला पकडतो. ती काठी पूर्ण कलण्याच्या पूर्वी शक्य तितकं त्या काठीच्या वर जाण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर समोरील वाळूच्या पट्ट्यात उडी घेतो…
- मात्र सर्वांनाच वाळूच्या पट्ट्यात उडी घेण्यात यश प्राप्त नाही. काही जण अपयशी ठरून पाण्यातही कोसळतात…‘ज्या क्षणी तुम्ही काठीच्या वर असता आणि तुम्हाला काठीवरून उडी मारायची असते त्या छोट्या क्षणी तुम्हाला जणू उ•ाण करावं लागतं आणि ते अनुभवणं खरोखरच छान असतं’, 25 वर्षीय खेळाडू बास व्हॅन लीउवेन हा उट्रेचजवळील एका गावात अशा स्पर्धेसाठी स्पर्धक जमलेले असताना सांगतो…
- यात खेळाडू कालव्यात एक टोक असलेल्या आणि काठाकडे झुकलेल्या कार्बन काठीच्या दिशेनं एका जेटीवरून धावत येतात, काठीवर उडी मारून पकड घेतात आणि दुसऱ्या काठावरील वाळूच्या भागात उडी मारण्यापूर्वी शक्य तितक्या वेगानं काठीच्या वर जाण्याचा प्रयत्न करतात…
- ऑलिंपिक पोल व्हॉल्टिंगच्या विपरित इथं लक्ष्य उंची पार करण्याचं नव्हे, तर अधिकाधिक अंतर कापण्याचा असतं. गती गमावली किंवा एका बाजूला खूपच घसरून कलल्यास खेळाडू कालव्यात पडून भिजू शकतात…
- त्याशिवाय वाळूवर यशस्वीरीत्या उतरणं हे सोपं नसतं. ते वेदनादायकही ठरू शकतं…‘हा खेळ खरोखर तितका धोकादायक नाही. मला वाटतं की, फुटबॉलदरम्यान जास्त लोक जखमी होतात’, असं व्हॅन लीउवेन म्हणतो. तो कालव्यावरून उडी मारताना झालेल्या पावलाच्या लिगामेंटच्या दुखापतीतून ठीक झालाय. ‘सहसा दुखापत ही पावलाला किंवा गुडघ्याला होते. कारण जेव्हा तुम्ही वाळूवर उतरता तेव्हा शरीराच्या त्या नाजूक भागाला दणका बसतो. कधीकधी तो तुटतो’, याकडे त्यानं लक्ष वेधलं…
- नेदरलँड्सच्या अनेक कालव्यांना पार करण्यासाठी अशा प्रकारे काठीचा वापर करणं हा एकेकाळी दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी एक सोयीस्कर मार्ग होता. 1950 आणि 60 च्या दशकात त्यानं आधुनिक स्पर्धात्मक स्वरूप धारण केलं, असं ‘फियर्लजेपेन’चे इतिहासकार विम रोस्कॅम सांगतात…
- तंत्रज्ञानामुळं मोठ्यात मोठी उडी मारणं शक्य झालंय आणि आता हा विक्रम 22.21 मीटरवर (24 यार्डपेक्षा जास्त) पोहोचलाय, असं रोस्कॅम सांगतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी वापरली जाणारी काठी ही लाकडी व खूप जड असायची. ती मोडू शकत होती. नंतर अॅल्युमिनियमची कमी जड काठी वापरात येऊ लागली. तरीही ती थोडी जड असायची. आता कार्बनची काठी वापरली जाते…
- हा प्रकार पाहण्यास मोठी गर्दी नसते. परंतु उडी मारणारे खेळाडू आणि त्यांचे चाहते हे या खेळाप्रती समर्पित आहेत. डच गावांमध्ये या प्रकाराचे एकनिष्ठ समर्थक आहेत, परंतु जवळच्या शहरांमध्ये त्याचा प्रसार झालेला नसून तिथं तो फारसा ज्ञात नाही, असं रोस्कॅम सांगतात…
– राजू प्रभू









