भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची तंदुऊस्ती व त्याच्यावरील ताणाचं व्यवस्थापन हा संघ व्यवस्थापन नि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यासाठी एक मोठा प्रश्न बनलाय…इंग्लंडविऊद्ध भारताला आव्हानात्मक पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला तोंड द्यावं लागूनही बुमराह त्याच्यावरील ताणाचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं फक्त तीन कसोटी लढती खेळला अन् तसं ते आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं…
- नव्यानं समोर येत असलेल्या वृत्तांप्रमाणं, ‘बीसीसीआय’ बुमराहच्या शरीराचं रक्षण करण्यासाठी आणि अधिक महत्त्वाच्या सामन्यांसाठी राखून ठेवण्याच्या दृष्टीनं त्याला खेळविण्याच्या बाबतीत आणखी मर्यादा घालण्याचा विचार करतेय…
- भारतीय संघ व्यवस्थापनाचं बुमराहला संरक्षण देण्याच्या आणि त्याला पुरेशी विश्रांती देण्याच्या निर्णयावर एकमत आहे. व्यवस्थापनाचं प्राधान्य बुमराहची कारकीर्द सर्वोच्च स्तरावर शक्य तितकी लांबविण्यास असल्यास दिसून येतं…
- विशेषत:, भारतीय संघ व्यवस्थापनाला आयसीसी स्पर्धा आणि इतर महत्त्वाच्या मालिकांसाठी बुमराहची उपलब्धता हवीय. फेब्रुवारी आणि मार्च, 2026 मध्ये भारतीय भूमीत होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी बुमराहला तंदुऊस्त व भेदक ठेवणं हे ‘बीसीसीआय’चं मुख्य लक्ष्य…
- या वर्षाच्या सुऊवातीला बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली, ज्यामुळं बॉर्डर-गावस्कर चषक 2024-25 मालिकेतील पाचही कसोटी सामने खेळल्यानंतर त्याला बराच काळ मैदानाबाहेर राहावं लागलं…
- जसप्रीतला आयपीएल, 2025 चा काही भाग देखील गमवावा लागल्यानं निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर अन् मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, तो इंग्लंडमध्ये फक्त तीनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळणार नाही…
- भारतानं इंग्लंडमध्ये जे दोन कसोटी सामने जिंकण्यात यश मिळवलं त्या दोन्हींमध्ये बुमराह खेळला नव्हता. ही बाब व्यवस्थापनाला त्याच्यावरील ताणाचं व्यवस्थापन करण्याच्या बाबतीत पुढची पावलं टाकण्यास प्रोत्साहित करून गेलीय…बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजनं भरपूर दणके दिले, तर वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी त्यांच्या तीन कसोटी सामन्यात अनुक्रमे 13 व 14 बळी घेतले…
- एका दाव्यानुसार, बुमराहनं क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात योगदान देण्याच्या त्याच्या इच्छेबद्दल बीसीसीआयला बोलून दाखविलंय. तथापि, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकानं त्याच्या अधिक वापराबद्दल व्यवस्थापनाला इशारा दिलाय, कारण त्याला पुन्हा दुखापत होण्याची शक्यता जास्त आहे….
- बुमराहबद्दल असंच मत ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांनीही व्यक्त केलंय…‘तुम्हाला त्याला जास्तीत जास्त सामने खेळवायचंय. कारण तो सामना जिंकून देणारा खेळाडू आहे. पण ते कठीण आहे, कारण त्याची गोलंदाजीची वेगळी शैली. तो इतर वेगवान गोलंदाजांपेक्षा त्याच्या शरीरावर जास्त ताण टाकतो’, असं ‘एमआरएफ पेस फाउंडेशन’चे संचालक असलेल्या मॅकग्रा यांनी म्हटलंय…
- शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत जसप्रीतला खेळलेल्या सामन्यांमध्ये कमी षटकं देऊन अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकला असता का यावर ते म्हणतात, ‘तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम गोलंदाजानं दीर्घकाळ गोलंदाजी करावी असं वाटतं असतं आणि खुद्द तोही गोलंदाजी करण्यास इच्छुक होता. पण जर बुमराहनं लहान स्पेलमध्ये गोलंदाजी केली, तर फलंदाजी करणारा संघ ती तीन-चार षटकं सहज खेळून काढू शकतो. बुमराहवर मोठे स्पेल टाकण्याची पाळी येऊ नये यासाठी भारताला वेगवान गोलंदाजांच्या आणखी एका संचाची आवश्यकता आहे’…
– राजू प्रभू









