इंग्लंड दौऱ्यासाठीच्या भारतीय कसोटी संघातून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला वगळलं जाण्याची शक्यता संघनिवड जाहीर होण्याच्या आधीपासून चर्चेत होती…तरीही अनेक क्रिकेटप्रेमींना इंग्लंडच्या वातावरणात त्याच्या हातातून सुटणारा चेंडू करामत दाखविताना पाहायला मिळणार अशी आशा होती. पण प्रत्यक्षात तसं झालेलं नसून त्याला बाहेर ठेवण्यात आलंय. त्यामुळं या भेदक गोलंदाजाची कारकीर्द समाप्तीच्या जवळ पोहोचलीय का असा प्रश्न ऐरणीवर आलाय…
- निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी इंग्लंड दौऱ्यासाठीच्या ज्या 18 सदस्यीय संघाची घोषणा केलीय त्यात बंगालचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं नाव नाही. याचं कारण तो अद्याप कसोटी सामन्यांचा ताण घेण्याइतपत तंदुरुस्त नाही आणि ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पाच सामन्यांनंतर आता इंग्लंडविरुद्धच्या पाच लढतीही हुकल्यानं त्याच्या कसोटीतील कारकिर्दीचं भविष्य अधांतरी लोंबकळू लागलंय…‘अमरोहा एक्सप्रेस’ त्याच्या 64 कसोटी सामन्यांमधील 229 बळींमध्ये आणखी भर घालू शकेल का, असा प्रश्न निर्माण झालाय…
- शमीच्या क्रिकेट कारकिर्दीवर दीर्घकाळापासून सावट पडलंय ते दुखापतीचं. दीड वर्षांपूर्वी पहिल्यांदा समोर आलेल्या पावलाच्या समस्येमुळं शस्त्रक्रिया करूनही आणि व्यापक पुनर्वसन कार्यक्रमानंतर देखील तो पूर्ण तंदुऊस्ती मिळवू शकलेला नाही…
- ऑस्ट्रेलियामध्ये भारताला त्याची अनुपस्थिती नक्कीच जाणवली. इंग्लंडमध्येही ती जास्तच प्रकर्षानं जाणवू शकते. याचं कारण चेंडू स्विंग करण्याची क्षमता आणि माऱ्यावरील नियंत्रण या त्याच्या खासियती…भारताच्या गेल्या इंग्लंड दौऱ्यातील त्याची कामगिरी याचा पुरावा आहे. कोविड-19 मुळं अंतिम सामना स्थगित होण्यापूर्वी चार कसोटी सामन्यांत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून देण्यात त्याची मोलाची भूमिका राहिली होती…
- शमीला होणारा दुखापतींचा त्रास ही तशी नवीन गोष्ट नव्हे…2015 च्या विश्वचषकात त्यानं गुडघ्याच्या दुखापतीनं सतावलेलं असताना देखील मारा केला होता…2023 च्या मायदेशात झालेल्या विश्वचषकातही त्यानं त्याचीच पुनरावृत्ती केली आणि पावलाला दुखापत झालेली असून देखील तो स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला…
- शमी फेब्रुवारी-मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला होता आणि या ‘आयपीएल’मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून तो बहुतेक सामने खेळलाय. परंतु गेल्या वर्षी स्थानिक हंगामात स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतल्यानंतर तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्मपासून खूप दूर असल्याचं दिसून आलंय…
- पावलावरील शस्त्रक्रियेतून परतल्यानंतर मध्य प्रदेशविऊद्ध तो एकमेव प्रथम श्रेणी सामना खेळला आणि त्या रणजी सामन्यात त्यानं 40 पेक्षा जास्त षटकं टाकली. खरी, पण विश्रांती घेण्यासाठी तो वारंवार ब्रेक घेताना दिसला…
- शमीनं शरीर कसोटी क्रिकेटसाठी तयार नसल्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात समाविष्ट करण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या विनंतीकडे लक्ष दिलं नव्हतं. तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून हळूहळू ताण वाढवू इच्छित होता, परंतु सहा महिन्यांनंतरही त्याचं शरीर कसोटीचा ताण पेलण्यास तयार नसल्याचं दिसून येतंय…बीसीसीआयच्या क्रीडा विज्ञान आणि वैद्यकीय पथकाच्या तज्ञांनी शमीचं शरीर दिवसाला 15 ते 20 षटकं गोलंदाजी करण्ंां आणि 90 षटकं मैदानात राहणं हा भार पेलण्यास सक्षम नसल्याचं म्हटलंय…
– राजू प्रभू









