भारतीय महिलांनी जिंकलेल्या विश्वचषकाची अकल्पनीयरीत्या शिल्पकार राहिली ती शेफाली वर्मा…मूळ निवडलेल्या संघात सोडाच, राखीव खेळाडूंतही तिचा समावेश नव्हता. तरीही तिच्यासमोर संधी चालून येते काय अन् सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ती अंतिम सामन्यात फलंदाजी नि गोलंदाजीतही प्रताप गाजवते काय…सगळंच विस्मयकारक…याभरात शेफाली महिलांच्या विश्चषकाच्या अंतिम फेरीचा विचार करता सर्वांत तरुण सामनावीर अन् सर्वांत जास्त धावा काढणारी भारतीय सलामीवीर ठरलीय…
- शेफाली वर्माची कारकीर्द पाहिल्यास तिची झेप आश्चर्यकारकच म्हणायला हवी…तिनं 15 व्या वर्षी भारताच्या टी-20 संघात पाऊल ठेवलं आणि या प्रकारात खेळलेली ती सर्वांत तऊण भारतीय बनली…़त्यानंतर काही आठवड्यांनी तिनं मान मिळविला तो आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्धशतक फटकावणारी सर्वांत तऊण खेळाडू बनण्याचा…2020 च्या सुऊवातीला ती आयसीसी टी-20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली होती…
- भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघानं पहिला टी-20 विश्वचषक 2023 साली जिंकला तो शेफालीच्याच नेतृत्वाखाली…पण महिला क्रिकेटमधील सर्वांत आक्रमक फलंदाजांपैकी एक म्हणून उदयाला येण्यापूर्वी हरियाणात जन्मलेल्या या मुलीला खेळण्याची संधी मिळविण्यासाठी मुलाचं रूप धारण करावं लागलं होतं…
- तिचा जन्म रोहंटक इथं झाला. तिथं क्रिकेट खेळाडू बनण्याची स्वप्नं पाहिली जायची ती मुलांकडूनच. पण शेफाली अशा चाकोरीत राहणारी नव्हती. तिचे वडील संजय वर्मा यांना एक लहान दागिन्यांचे दुकान चालवताना पाहत ती मोठी झाली, परंतु त्यांचं खरं आकर्षण क्रिकेट होतं. त्यांना मुलीची प्रतिभा लवकर लक्षात आली. पण समोर समस्या मोठी होती. कारण परिसरात मुलींसाठी क्रिकेट अकादमीच नव्हती…
- मग वडिलांनी तिचे केस एकदम लहान केले. तिला मुलासारखे कपडे घातले आणि मुलांच्या अकादमीत दाखल केलं. दररोज लहान शेफाली अशा वेगवान गोलंदाजांना तोंड द्यायची, ज्यांना वाटायचं की, ती मुलांपैकी एक आहे आणि दररोज ती चेंडू फटकावण्याचं काम प्रामाणिकपणे करायची…
- 2019 मध्ये वेस्ट इंडिजविऊद्ध 49 चेंडूंत काढलेल्या 73 धावा निर्भय, धाडसी शेफालीचं दर्शन घडवून गेल्या…अमोल मुझुमदारसारख्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ती आक्रमकतेला योग्य वळण कसं द्यायचं ते शिकलीय. ती आता निव्वळ फटकेबाज नाही, तर विचार करून खेळणारी क्रिकेटपटू बनलीय…
- पण 2024-25 मध्ये शेफाली वर्माची एकदिवसीय सामन्यांतील कामगिरी खराब राहिली आणि निवड समितीनं सातत्याला महत्त्व देत विश्वचषक संघाची घोषणा करताना तिला डावलून प्राधान्य दिलं ते प्रतीका रावलला…(गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारताच्या एकदिवसीय संघातूनही तिला वगळण्यात आलं होतं. तेव्हा वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आलेला असल्यानं तिनं डच्चू दिल्याची बातमी सुरुवातीला त्यांना कळू दिली नव्हती)…
- रावलनंही देशांतर्गत स्पर्धांतील फॉर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम राखल्यानं शेफालीला वगळण्याचा निर्णय योग्य वाटू लागला…पण बांगलादेशविरुद्धच्या भारताच्या शेवटच्या साखळी सामन्यादरम्यान प्रतिकाच्या पावलाला दुखापत झाली आणि ती स्पर्धेतून बाहेर पडल्यानं संघाला आठवण झाली ती शेफालीची…
- शेफालीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगला खेळ करता न आल्यानंतर क्रिकेट पंडितांनी तिला अंतिम सामन्यात खेळविण्याबाबत शंका व्यक्त करायला सुरुवात केली होती. पण संघ व्यवस्थापनानं तिच्यावर विश्वास ठेवून आणखी एक संधी दिली. यावेळी तिनं निराश केले नाही. अंतिम सामन्यात 78 चेंडूंत 87 धावांची चमकदार खेळी करून तिनं डावाचा पाया रचला अन् त्यानंतर तीन षटकांत केवळ 8 धावा देत सुन लूस व मॅरिझान कॅप यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखविल्यानं सामन्याचं स्वरूपच बदललं…
- – राजू प्रभू









