शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील नवीन ‘टीम इंडिया’नं इंग्लंडमधील कसोटी मालिका बरोबरीत सोडविल्यानंतर एक वेगळीच चर्चा सुरू झालीय…रोहित शर्मा व विराट कोहलीच्या (रोको) कारकिर्दीची समाप्ती जवळ आलीय का, गिलकडे एकदिवसीय संघाचंही नेतृत्व सोपवावं का, असे प्रश्न वेगवेगळ्या व्यासपीठांवरून उपस्थित केले जाऊ लागलेत…
- भारताची पुढील एकदिवसीय मालिका जवळ पोहोचत असल्यानं दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या भविष्याविषयीच्या चर्चांना जास्तच ऊत आलाय…309 लढतींतून 51 शतकांसह 14181 धावांचा डोंगर रचलेला विराट नि 273 सामन्यांतून 32 शतकांसह 11168 धावा जमविलेला रोहित हे 2027 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकापर्यंत खेळू शकतील का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय…त्या विश्वचषकापर्यंत कोहली अन् रोहित अनुक्रमे 39 नि 40 वर्षांचे असतील, त्यामुळं त्यांचं वय हा महत्त्वाचा मुद्दा बनलाय…
- भारताची ऑगस्टमध्ये ठरलेली बांगलादेशविऊद्धची एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आल्यामुळं 19 ते 25 ऑक्टोबरदरम्यान होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही पुढील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा राहणार आहे…
- ‘जर त्यांच्या मनात काही असेल, तर ते इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यापूर्वी ज्याप्रमाणं पवित्रा स्पष्ट केला त्याप्रमाणं ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्यांना सांगतील. परंतु भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून पुढील मोठी मोहीम ही फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची आणि त्यापूर्वीच्या तयारीची आहे. याशिवाय सध्या लक्ष केंद्रीत केलं जाईल ते आशिया चषक टी-20 स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ पाठवण्यावर’, असं ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितलंय…
- दोन्ही खेळाडूंनी खेळलेला शेवटचा एकदिवसीय हा सामना दुबईतील चॅम्पियन्स ट्रॉफीमधील होता. त्या स्पर्धेत कोहलीनं पाकिस्तानविऊद्ध गट टप्प्यातील सामन्यात शतक झळकावलं होतं, तर रोहितनं अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण अर्धशतकाची नोंद केली होती…भारतानं जेतेपद मिळविलेल्या या स्पर्धेत विराटनं 5 सामन्यांतून 218 धावा अन् शर्मानं 180 धावा जमविल्या…
- 2024 मध्ये टी-20 तून आणि या वर्षाच्या सुऊवातीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेले रोहित किंवा विराट अलीकडे कोणतंही क्रिकेट खेळलेले नसल्यानं त्यांच्याविषयीच्या अटकळींना आणखी जोर मिळालाय…इंडियन प्रीमियर लीग संपल्यापासून त्यांनी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये भाग घेतलेला नाही…
- परंतु सध्या तरी असं दिसतंय की, रोहित व विराट गेल्या दीड दशकात पूर्णपणे वर्चस्व गाजविलेल्या या प्रकारात शेवटचा धडाका लावू इच्छितात…लंडनमध्ये राहणाऱ्या कोहलीनं इंस्टाग्रामवर ‘इनडोअर नेट सेशन’ची स्टोरी पोस्ट करत सरावाकडे पुन्हा वळविण्याची चिन्हं दाखविलीत…‘आयपीएल’नंतर ब्रिटन गाठलेला रोहितही मुंबईत परतलाय आणि लवकरच तो सराव सुरू करण्याची अपेक्षा आहे…
- रोहित व कोहली ऑक्टोबरमधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर एकदिवसीय कारकिर्दीला पूर्णविराम देऊ शकतात, असं वृत्त काही माध्यमांनी दिलंय…काही माध्यमांनी त्यांच्यासमोर 25 ऑक्टोबर रोजी सिडनीत होणाऱ्या निरोपाच्या सामन्याचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो असंही वृत्त दिलेलं असलं, तरी ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी अद्याप अशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असं स्पष्ट केलंय…
- ऑस्ट्रेलियात भारत तीन 50 षटकांचे सामने खेळणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविऊद्ध मायदेशी तीन एकदिवसीय सामने…2026 साली न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिजविऊद्ध एकदिवसीय मालिका आणि न्यूझीलंडविऊद्ध आणखी एक मालिका होणार आहे…2027 च्या विश्वचषकापूर्वी भारत 27 एकदिवसीय सामने त्याव्यतिरिक्त ‘वनडे’ स्वरुपातील 2027 चा आशिया चषक खेळणार आहे…तोवर विराट कोहली नि रोहित शर्मा टिकाव धरू शकतील का ?…
– राजू प्रभू









