वयाच्या आठव्या वर्षी अमेरिकन ओपन पाहताना स्टँडमध्ये नृत्य करण्यापासून ते 11 वर्षांनंतर आर्थर अॅश स्टेडियममध्ये त्याच स्पर्धेचा चषक उचलण्यापर्यंत कोरी ‘कोको’ गॉफनं टेनिस जगतात घेतलेली भरारी ही अभूतपूर्व अशीच…नुकतीच फ्रेंच ओपन जिंकून या 21 वर्षीय अमेरिकन टेनिस स्टारनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, ती केवळ एक उदयोन्मुख प्रतिभा नाही, तर प्रतिस्पर्ध्यांनी धसका घ्यावी अशी मातब्बर खेळाडू आहे…
- 13 मार्च, 2004 रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील डेलरे बीच भागात जन्मलेल्या कोरी डायोन गॉफचा लहानपणापासूनच टेनिसकडे ओढा राहिला आणि 10 वर्षांची असताना ती टेनिस सुपरस्टार सेरेना विल्यम्सचे दीर्घकाळ प्रशिक्षक राहिलेल्या पॅट्रिक मोराटोग्लू यांच्याकडून धडे घेण्यासाठी फ्रान्सला गेली…
- 2019 साली विम्बल्डनमध्ये ‘वाइल्ड कार्ड’ प्रवेश मिळाल्यानं तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर सनसनाटी पदार्पण करताना या 15 वर्षांच्या मुलीनं स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत धूळ चारली ती तिची बालपणीची आदर्श व्हीनस विल्यम्सला. 1991 मधील जेनिफर कॅप्रियातीनंतर या ग्रास कोर्टवरील स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पोहोचणारी गॉफ ही सर्वांत तऊण खेळाडू ठरली. त्या वर्षाच्या अखेरीस अमेरिकन ओपनची तिसरी फेरी गाठून तिनं भविष्यातील ‘स्टार’ म्हणून आपली प्रतिमा आणखी मजबूत केली…
- 2019 ची लिंझ ओपन आणि 2021 ची एमिलिया-रोमाग्ना ओपन जिंकून तिनं जागतिक क्रमवारीत सातत्यानं प्रगती केली असली, तरी ग्रँड स्लॅमचं जेतेपद हाती येत नव्हतं. 2022 मध्ये ती फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली, परंतु इगा स्वायटेककडून सरळ सेट्समध्ये पराभूत झाली. हा तिचा एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिला पराभव…
- गॉफनं 2023 मध्ये ऑकलंड ओपन जिंकून चांगली सुरुवात केली खरी, पण त्यानंतर तिचा फॉर्म खूपच घसरला. मात्र पेरे रिबा आणि ब्रॅड गिल्बर्ट यांना आपल्या प्रशिक्षण व्यवस्थेत आणणं हा तिच्यासाठी एक ‘मास्टर स्ट्रोक’ ठरला…मग या अमेरिकन तरुणीनं वॉशिंग्टन ओपनचं आणि सिनसिनाटीमध्ये पहिलं डब्ल्यूटीए 1000 जेतेपद पटकावलं ते आठ सामन्यांमध्ये पहिल्यांदाच स्वायटेकला हरवून…
- त्यानंतर पदरात पडला तो अमेरिकन ओपनचा किताब. मायदेशातील दबावाला न जुमानता या 19 वर्षीय खेळाडूनं अंतिम फेरीत पिछाडीवरून उसळी घेत आर्यना साबालेन्काचा पराभव केला. यामुळं 1999 मधील सेरेना विल्यम्सनंतरची अमेरिकन ओपनमधील सर्वांत तऊण महिला एकेरी विजेती हा मान चालून गेला…
- कोको गॉफनं गेल्या वर्षीही फ्रेंच ओपनमध्ये शानदार कामगिरी करत एकेरीची उपांत्य फेरी गाठली आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. याखेरीज कॅटरिना सिनियाकोवासोबत रोलँ गॅरोवरील पहिला दुहेरीचा किताबही खिशात घातला…
- गॉफनं पॅरिसमध्ये ऑलिंपिक पदार्पण करताना अमेरिकेची सर्वांत तरुण ध्वजवाहक खेळाडू बनून इतिहास रचला. दुर्दैवानं एकेरीत तिला तिसऱ्या, तर दुहेरीत दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला…
- तिनं गतवर्षाचा शेवट केला तो ‘डब्ल्यूटीए फायनल्स’चं एकेरी जेतेपद पटकावून. मग 20 वर्षांची कोको गॉफ 2004 मधील मारिया शारापोव्हानंतरची सर्वांत तऊण ‘डब्ल्यूटीए फायनल्स चॅम्पियन’ बनली…
- अन् आता त्यात भर जगातील अव्वल क्रमांकाची खेळाडू आर्यना साबालेन्काला नवमून जिंकलेल्या फ्रेंच ओपनची. हा तिचा दुसरा ग्रँड स्लॅम किताब…
- सर्वांत महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक टेनिसपटू म्हणून कारकीर्द घडवत असतानाही तिनं शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिलेलं नाही…
– राजू प्रभू









