नुकतीच झालेली क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा ही खास राहिली ती प्रथमच विविध राष्ट्रांमधील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या धर्तीवर खेळविण्यात आल्यानं…नेहमीप्रमाणं मर्यादित संघांपुरती न ठेवता यावेळी तिची व्याप्ती भरपूर वाढविण्यात आली होती. विश्वातील विविध खंडांतील दिग्गज क्लब उतरल्यानं नेमकी कुणाची सरशी होईल हे जसं सांगणं कठीण बनलं होतं तसंच कुतुहलही वाढलं होतं…त्यात शेवटी अनपेक्षितरीत्या बाजी मारली ती चेल्सीनं…
- एप्रिलच्या सुऊवातीला ‘लीग वन’चं विजेतेपद जिंकण्यापासून ते ‘चॅम्पियन्स लीग’च्या अंतिम फेरीत इंटर मिलानचा एकतर्फी लढतीत सफाया करण्यापर्यंत संपूर्ण हंगामात पॅरिस सेंट-जर्मेननं जबरदस्त धडाका दाखविला होता…
- क्लब वर्ल्ड कपमध्येही ते अशाच पद्धतीनं खेळत असल्याचं दिसून आलं होतं. त्यांनी आपल्या घोडदौडीदरम्यान बायर्न म्युनिकवर मात केली आणि नंतर अंतिम फेरीत पोहोचताना रेयाल माद्रिदला 4-0 अशी धूळ चारली. त्यामुळं न्यू जर्सीमध्ये जेव्हा अंतिम लढतीत चेल्सीचा सामना करण्यासाठी ते मैदानात उतरले तेव्हा चषकाचे सर्वांत प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं गेलं ते त्यांच्याचकडे. पण प्रत्यक्षात घडलं ते भलतंच…
- अंतिम सामन्याचं मध्यांतर येण्यापूर्वीच कोल पामरनं केलेले दोन उत्कृष्ट गोल आणि जुआंव पेद्रोला आणखी एक गोल करण्याची त्यानं उपलब्ध करून दिलेली संधी चेल्सीला 3-0 अशी आघाडी देऊन गेली. ती कायम राहिली आणि शेवटी चषक या ब्रिटिश क्लबच्या खात्यात जमा झाला…
- चेल्सीवर या स्पर्धेतून काही कमी पैशांचा वर्षाव झाला नाही. उच्च व्यावसायिक रँकिंगच्या आधारे त्यांना सहभागासाठी शुल्क मिळाले ते अंदाजे 33 ते 38.19 दशलक्ष डॉलर्स…
- गट टप्प्यात चेल्सीनं प्रत्येक विजयामागं 2 दशलक्ष डॉलर्स याप्रमाणं कमावले 4 दशलक्ष डॉलर्स. त्यांनी या स्तरावर दोन विजय नोंदविले, तर एक पराभव स्वीकारावा लागला.
- मग उपउपांत्यपूर्व फेरीत थडकल्याबद्दल 7.5 दशलक्ष डॉलर्स, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्याबद्दल 13.125 दशलक्ष डॉलर्स, उपांत्य फेरीत पाऊल ठेवल्याबद्दल 21 दशलक्ष डॉलर्स, तर अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल 30 दशलक्ष डॉलर्स अशी कमाई त्यांनी केली. विजेतेपदापोटी त्यांना मिळाले 40 दशलक्ष डॉलर्स…
- या प्रीमियर लीगमधील संघानं नव्या स्वरुपातील क्लब विश्वचषक स्पर्धेत पाऊल टाकलं होतं ते मे महिन्यात रिअल बेटिसला हरवून यूएफा कॉन्फरन्स लीगचं विजेतेपद पटकावल्यानंतर…चेल्सीनं यापूर्वी दोनदा क्लब वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आधी 2012 साली अन् नंतर 2021 मध्ये. या दोन्ही हंगामांत यूएफा चॅम्पियन्स लीगचा किताब पटकावला होता तो त्यांनीच…
- तथापि, 2012 मध्ये पाओलो ग्वेरेरोच्या हेडरच्या जोरावर ब्राझिलियन संघ कोरिनथियन्सनी अंतिम फेरीत त्यांचा 1-0 असा पराभव केला….लंडनच्या या क्लबनं 2021 मध्ये सुधारणा केली अन् अंतिम फेरीत अतिरिक्त वेळेत पाल्मिरासला 2-1 असं हरवून पहिलं क्लब वर्ल्ड कप जेतपद प्राप्त केलं…
- मात्र या खेपेचं जेतेपद जास्त खास, कारण यावेळी स्पर्धेच्या रचनेत सुधारणा करताना त्यात 7 ऐवजी 32 संघांना वाव देण्यात आला होता. नियमित मोसम संपल्यानंतर जवळपास महिनाभर ही स्पर्धा अमेरिकेत चालली…आता पुढील क्लब विश्वचषक स्पर्धा होईल ती 2029 साली…
– राजू प्रभू









