उचगाव ग्रा. पं. चा अजब कारभार : ठेकेदाराविरोधात युवक-ग्रामस्थ संतप्त : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा
वार्ताहर /उचगाव
उचगाव तलावामध्ये खोदाई करण्यासाठी ठेकेदाराने घेतलेले काम रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यासाठी महिलांना पाचारण केल्याने संतप्त युवकांनी रविवारी सदर कामाची प्रत्यक्ष पाहणी करून याचा जाब उचगाव ग्राम पंचायत अध्यक्षांना विचारला. सदर काम शासकीय फंडातून झालेले असूनही अद्याप उर्वरित काम ठेकेदाराने करावयाचे असताना रोजगार महिलांना सदर कामाला जुंपल्याने याचे गौडबंगाल काय? असा प्रश्न तमाम उचगाव ग्रामस्थांमधून विचारण्यात येत आहे.
उचगावच्या पूर्वेला दहा एकर जागेमध्ये मोठा तलाव आहे. तो शेतकऱयांसाठी महत्त्वाचा आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग शेती तसेच ग्रामस्थ इतर कामांसाठी करत असतात. या तलावाची खोदाई व सुशोभिकरणासाठी शासनाकडून साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रकमेतून त्याचे काम हाती घेण्यात आले. गेल्या वर्षी पाऊस सुरू झाल्याने अर्धवट राहिलेले सदर काम यावर्षी पूर्ण करण्याचे ठेकेदाराने सांगितले होते. मात्र, संपूर्ण वर्ष लोटले, पुन्हा या वर्षीचा पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप ठेकेदाराने तलावाकडे ढुंकूनही पाहिले नाही. या तलावाची अद्याप पाच फूट खोदाई करून त्यामध्ये एक फूट जाडीचा काळय़ा मातीचा थर टाकावयाचे उर्वरित काम बाकी असताना, रविवारी अकस्मात रोजगार हमी योजनेंतर्गत महिलांना या तलावातील माती काढण्याचे काम लावल्याने ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी तातडीने तलावाकडे धाव घेऊन महिलांशी विचारपूस केली असता रोजगार हमी योजनेंतर्गत माती काढण्यासाठी आपण आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रा.पं. अध्यक्ष जावेद जमादार यांना बोलावून ग्रामस्थांनी विचारले असता त्यांनी समर्पक उत्तर दिले नसल्याचे समजते.
सदर काम रोजगार हमी योजनेंतर्गत महिलांनी सुरू ठेवले आहे. मग उर्वरित काम ठेकेदार केव्हा करणार व राहिलेल्या रकमेचे काय झाले, याबद्दल तातडीने ठेकेदाराने ग्रामस्थांना माहिती द्यावी व या कामाची शहानिशा करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रविवारी दुपारी सदर कामाच्या ठिकाणी ग्रा. पं. माजी सदस्य किसन नावगेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव विभागप्रमुख मिथिल जाधव, सुनील कोळी, पुंडलिक पावशे, विशाल कोवाडकर, मल्लाप्पा कोवाडकर, श्रीकांत जाधव, अमोघ कोळी, राहुल सुभेदार, रामा कोवाडकर, सिद्राय लाळगे, उमेश कोवाडकर, राकेश लाळगे, महेश देसाई यांनी पाहणी करून चौकशी केली. सदर काम घेतलेल्या ठेकेदाराने तातडीने उचगावला भेट देऊन या संदर्भात खुलासा करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून याबाबत आवाज उठविला जाईल, असा इशारा उचगाव ग्रामस्थांनी व युवकांनी दिला आहे.









