बालके आजारी, स्थानिक महिला संतप्त : उपाययोजना न झाल्यास मोर्चाचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
मागील आठ दिवसांपासून कोनवाळ गल्लीत दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अन्यथा मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिक महिलांनी दिला आहे.
मागील काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. शिवाय आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषतः अनेक बालकांना उलटी-जुलाब व इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यातच काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
गळती शोधून दूर करण्याची मागणी
पाणीपुरवठा करणाऱया एल ऍण्ड टी कंपनीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र जलवाहिनीला गळती लागल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. जलवाहिनीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती आली असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. गळती शोधून ती दूर करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









