क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील काल खेळविण्यात आलेल्या लढतीत ओडिशा एफसीने विजयी सलामी देताना चेन्नईन एफसीचा 2-0 असा पराभव केला. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला. विजयाने ओडिशा एफसीला तीन गुण प्राप्त झाले. त्यांच्यासाठी जॅरी माविहमिंगथांगा आणि डायगो मॉरीसियो यांनी गोल केले.
सामन्याच्या 21व्या मिनिटाला चेन्नईन एफसीला गोल करण्याची संधी होती. यावेळी कॉन्नोर शिल्डसने दिलेल्या पासवर राफायल क्रिवेल्लारोचा यत्न थोडक्यात हुकला. त्यानंतर ओडिशा एफसीच्या अहमद जाहूने गोल करण्याची संधी दवडली. मध्यंतराला दोन मिनिटे शिल्लक असताना राकेश सांगवानच्या क्रॉसवर कॉन्नोर शिल्डसचा हेडर गोलमध्ये जात असताना किंचित हुकला.
मध्यंतराच्या ठोक्याला ओडिशा एफसीने गोल करून आघाडी घेतली. हा गोल अमेय रानावडेच्या पासवर जॅरी माविहमिंगथांगाने केला. दुसऱ्या सत्रात चेन्नईन एफसीने आक्रमक खेळ करून गोल करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या जॉर्डन मरे व फारुख चौधरीचे गोल करण्याचे यत्न हुकले.