वृत्तसंस्था/ पुणे
पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत सूरज लाडेचे अफलातून आक्रमक आणि विशालचा अभेद्य बचाव अशा चौफेर कामगिरीच्या जोरावर ओडिशा जगरनट्स संघाने तेलगु योद्धाजचा पराभव करताना सलग सहाव्या विजयाची नोंद केली..
बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सूरज लाडे याने तेलगु योध्दाजचे चार गडी बाद करताना एकूण 10 गुणांची नोंद केली. तर, विशालने 3 मिनिटे 53 सेकंद बचाव करताना ओडिशाला 6 बोनस गुण मिळवून दिले. या कामगिरीमुळे ओडिशाला पिछाडीवरुन पुनरागमन करत तेलगु योद्धाजचा 48-39 असा 9 गुणांच्या फरकाने पराभव करता आला.
विजयी ओडिशा संघाकडून एमके गौतम याने 9 गुणांची कमाई करताना संघाच्या कामगिरीत महत्वाचा वाटा उचलला. तर तेलगु योद्धाज कडून आदर्श मोहितेने 9 गुण नोंदवताना दिलेली झुंज अपयशी ठरली. या विजयामुळे ओडिशाला एकूण 21 गुणांसह गुण तालिकेत अव्वल स्थानी झेप घेता आली. गुजरात संघ 17 गुणांसह दुसऱया क्रमांकावर आहे. त्याआधी तेलगु संघाने आक्रमक सुरुवात करताना ओडिशाचा कर्णधार दिपेश मोरे आणि दिनेश नाईक यांना लवकर बाद करून पहिल्या सत्रा अखेर 20 गुणांची आघाडी घेतली. मोहितेने 4 गुण मिळवले. दुस्रया सत्रात कर्णधार प्रतीक वाईकरने 3 मिनिटे 59 सेकंद संरक्षण करताना तेलगु योद्धाज 2 बोनस गुण मिळवून दिल्यामुळे पहिल्या डावाअखेर त्यांना ओडिशावर 22-18 अशी आघाडी घेता आली.
तिसऱया सत्रात ओडिशाच्या विशाल आणि सुभाषिश संत्रा यांच्या अप्रतिम सरंक्षणामुळे तेलगु योद्धाजला केवळ 19 गुण मिळवता आले. विशालने 3मिनिटे 53 सेकंद संरक्षण करताना ओडिशाला 6 बोनस गुण मिळवून दिले. तर संत्राने 2 मिनिटे 42 सेकंदात 2 बोनस गुणांची कमाई केली. अत्यंत महत्वाच्या चौथ्या सत्रात तेलगु योद्धाजचे 9 गडी बाद करतानाच ओडिशाने एकूण 22 गुणांची कमाई केली आणि त्यामुळे निसरटता विजय मिळवला आला.









