वृत्तसंस्था/ रांची
2024-25 च्या राष्ट्रीय महिला हॉकी लीग स्पर्धेतील अंतिम टप्प्यात येथे सुरू असलेल्या विविध लढतींमध्ये ओडीशा, मिझोराम, महाराष्ट्र आणि झारखंड यांनी प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय नोंदविले.
स्पर्धेच्या पाचव्या दिवशी अ गटातील झालेल्या पहिल्या सामन्यात ओडीशाने हरियाणाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. ओडीशातर्फे पी. किंडो आणि शिबानी लुगून यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या विजयामुळे ओडीशाने या गटात दुसरे स्थान मिळविले. अ गटातील अन्य एका सामन्यात मिझोरामने मध्यप्रदेशचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. मिझोरामतर्फे ललितलाचुंगी आणि मंगलावेमसंग यांनी प्रत्येकी 1 गोल तर मध्यप्रदेशतर्फे एकमेव गोल सुनिताकुमारीने केला. या विजयामुळे मिझोराम संघाने आपल्या गटातून तिसरे स्थान मिळविले आहे. मध्यप्रदेश संघ पाचव्या स्थानावर आहे.
अ गटातील तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने बंगालचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. सानिका माने, तनुश्री काडू, निकु गुर्जर आणि खुशी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. बंगालतर्फे जमुना एक्काने तसेच सुबीला तिर्कीने गोल नोंदविले. स्पर्धेच्या गुणतक्त्यात महाराष्ट्र सहाव्या स्थानावर असून बंगालला अद्याप आपले खाते उघडता आलेले नाही. अ गटातील शेवटच्या सामन्यात झारखंडने मणिपूरचा 8-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. झारखंडतर्फे स्वीटी डुंगडुंगने तसेच संगीता कुमारीने प्रत्येकी 3 तर पिंकीकुमारीने 2 गोल केले. या विजयामुळे झारखंडचा संघ गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर असून मणिपूर सातव्या स्थानावर आहे. मणिपूरने आतापर्यंत एकमेव विजय मिळविला आहे.









