तिसऱया व शेवटच्या वनडेत भारताचा 119 धावांनी विजय, 3-0 फरकाने बाजी

वृत्तसंस्था /पोर्ट ऑफ स्पेन
वनडे कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या शतकापासून अवघ्या दोन धावांनी वंचित रहावे लागल्याने शुभमन गिल कमनशिबी ठरला असला तरी त्याच्या नाबाद 98 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने तिसऱया व शेवटच्या वनडेत यजमान विंडीजचा 119 धावांनी धुव्वा उडवला आणि 3 सामन्यांची ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. पावसाने व्यत्यय आणलेल्या या लढतीत भारताने निर्धारित 36 षटकात 3 बाद 225 धावांचा डोंगर रचला. पण, डकवर्थ लुईस नियमाचा अवलंब केला गेल्यानंतर विंडीजला 35 षटकात 257 धावांचे आणखी खडतर, सुधारित आव्हान देण्यात आले आणि प्रत्युत्तरात त्यांचा डाव अवघ्या 26 षटकात 137 धावांमध्येच गुंडाळला गेला.

फिरकीपटू यजुवेंद्र चहल (4 षटकात 4-17), अक्षर पटेल (6 षटकात 1-38), सीमर शार्दुल ठाकुर (5 षटकात 2-17) व सिराज (2-14) यांनी विंडीजच्या डावाला जोरदार सुरुंग लावत आपली जबाबदारी चोख पार पाडली. ब्रेन्डॉन किंगने 37 चेंडूत 42 तर निकोलस पूरनने 32 चेंडूत 42 धावा केल्या. मात्र, त्यांचा हा प्रतिकार कधीच पुरेसा ठरणारा नव्हता.
धवन अँड कंपनीने प्रतिकूल वातावरणात खेळत असतानाही दडपण उत्तमरित्या हाताळले आणि हीच या मालिकेतील निर्णायक बाजू ठरली. एखाद्या लढतीत आघाडी फळी अगदीच कोसळली तरी मध्यफळीने जबाबदारीने लढत विजय खेचून आणण्याचा पराक्रम गाजवला, ते लक्षवेधी ठरले. वास्तविक, तिसऱया सामन्यात पावसाचा दोनवेळा व्यत्यय आल्यानंतर एकाग्रता भंग होऊ न देणे आव्हानात्मक होते. पण, शैलीदार गिल आणि गुणवान फलंदाज श्रेयस अय्यर (34 चेंडूत 44) यांनी ब्रेकनंतर सामन्याचा नूर पालटला.
पावसामुळे खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी भारताने 24 षटकात 1 बाद 115 धावा केल्या होत्या. मात्र, नंतर खेळाला सुरुवात झाल्याने त्यांनी अवघ्या 12 षटकात आणखी 112 धावांची आतषबाजी केली. या मालिकेत बहरात राहिलेल्या गिलने अनुक्रमे 64, 43 व नाबाद 98 धावांची आतषबाजी केली आहे. धवन व गिल यांनी 113 धावांची सलामी दिली. ही त्यांची या मालिकेतील दुसरी शतकी भागीदारी ठरली.
संक्षिप्त धावफलक
भारत : 36 षटकात 3 बाद 225 (शुभमन गिल 98 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 98, शिखर धवन 74 चेंडूत 7 चौकारांसह 58, श्रेयस अय्यर 34 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 44. अवांतर 11. हेडन वॉल्श 2-57, अकिल होसेन 1-43).
विंडीज : 26 षटकात सर्वबाद 137 (ब्रेन्डॉन किंग 37 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारांसह 42, निकोलस पूरन 32 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारांसह 42, शाय होप 33 चेंडूत 1 षटकारासह 22 धावा. यजुवेंद्र चहल 4 षटकात 4-17, शार्दुल ठाकुर 2-17, सिराज 2-14, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा प्रत्येकी 1 बळी).
5 सामन्यांच्या मालिकेत उभय संघात आज पहिली टी-20

विंडीजचा वनडे मालिकेत एकतर्फी धुव्वा उडवल्यानंतर आता टी-20 मालिकेतही तीच विजयी घोडदौड कायम राखण्याची भारताची महत्त्वाकांक्षा असेल. ऑस्ट्रेलियातील आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेला केवळ 3 महिने बाकी असून भारतीय संघ त्यापूर्वी 16 टी-20 सामने खेळेल. यादरम्यान संघाची वर्ल्डकपमधील लाईनअप कशी असेल, हे निश्चित होत जाणार आहे. सध्याची विंडीजविरुद्धची मालिका 5 सामन्यांची असून आज पहिली लढत रात्री 8 वाजता सुरु होईल.

भारतीय संघ विंडीजविरुद्ध 5, त्यानंतर आशिया चषक स्पर्धेत 5, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 असे एकूण 16 टी-20 सामने खेळणार आहे.
विराटसारखा अव्वल दर्जाचा फलंदाज मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात अतिशय खराब फॉर्ममध्ये असताना सध्याचे चित्र पाहता, रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक असे 5 स्पेशालिस्ट फलंदाज पहिल्या सहामध्ये समाविष्ट असतील, हे सुस्पष्ट आहे.
विराटच्या जागेवर दीपक हुडा?
विंडीजविरुद्ध 5 सामन्यांची ही मालिका तांत्रिकदृष्टय़ा 3 स्वतंत्र देशात (त्रिनिदाद अँड टोबॅगो, सेंट किट्स अँड नेव्हिस, अमेरिका) येथे खेळवली जाणार असून यादरम्यान विराट कोहलीची भविष्यातील वाटचाल कशी असेल, हे देखील स्पष्ट होणे अपेक्षित आहे. एकीकडे, विराट सातत्याने अपयशी ठरत असताना दुसरीकडे, दीपक हुडाने विराटच्या गैरहजेरीत त्याच्या जागेवर उत्तम चुणूक दाखवली असून हा मुद्दाही सातत्याने चर्चेत येत राहिला आहे. टी-20 मध्ये तिसऱया क्रमांकावरील फलंदाज बहरात असणे क्रमप्राप्त असते. त्यामुळेही यावर गांभीर्याने विचारमंथन सुरु असणे साहजिक आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
विंडीज (संभाव्य) : निकोलस पूरन (कर्णधार), शमरह ब्रूक्स, ब्रेन्डॉन किंग, रोव्हमन पॉवेल, किसी कार्टी, काईल मेयर्स, जेसॉन होल्डर, गुडकेश मॉटी, किमो पॉल, शाय होप, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, सीलेस.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा., थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स.









