पुराचा धोका टळला : शेतकऱयांना दिलासा, मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत 22.1 मि. मी. नोंद
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, रविवारी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पुढील धोका टळला आहे. सोमवारी रात्री साडेआठपासून मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत 22.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नदी-नाले प्रवाहित झाले. तर गेल्या दोन दिवसांपासून सतत संततधार पावसामुळे नाले तसेच नद्याही दुथडी भरून वहात होत्या. हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत जोरदार पाऊस कोसळेल, अशी शक्मयता व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी केली आहे. मात्र, मंगळवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाऊस कमी होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
संततधार पावसामुळे बळ्ळारी नाला तसेच मार्कंडेय नदीच्या काठावरील शिवारामध्ये पाणी साचून आहे. त्यामुळे भातपिकाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत मंगळवारी पाऊस कमी झाल्यामुळे धोका टळला आहे. या पावसामुळे शिवारामध्येही पाणी साचून आहे. पावसामुळे जलाशयांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. पण जलाशये पूर्ण भरण्यासाठी अजूनही मोठय़ा पावसाची गरज आहे.
सखल भागामध्ये अजूनही पाणी साचून
रविवार आणि सोमवारी पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, मंगळवारी पाऊस कमी झाल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. या पावसामुळे सखल भागामध्ये अजूनही पाणी साचून आहे. तसेच गटारीतील कचरा रस्त्यावर पडून होता. या पावसामुळे हवेमध्ये कमालीचा गारठा निर्माण झाला होता. हवामान खात्याने दमदार पाऊस पडण्याची शक्मयता वर्तविली होती, मात्र सध्या तरी पावसाने बऱयापैकी उसंत घेतल्याने दिलासा मिळाला आहे.









