काहीसा दिलासा : संततधार पावसाची प्रतीक्षा
प्रतिनिधी / बेळगाव
गेले दोन-तीन दिवस पावसाने दडी मारली होती. गुरुवारी दिवसभर पावसाच्या अधूनमधून सरी कोसळल्या. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही दमदार सरी कोसळून मुबलक पाणी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गुरुवारी अधूनमधून सरी आल्यामुळे फेरीवाले व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली.
गुरुवारी शहरासह ग्रामीण भागामध्ये दिवसभर अधूनमधून सरी कोसळल्या. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या सरी कोसळत असल्या तरी किमान दोन दिवस जोरदार पाऊस होणे गरजेचे आहे. जोरदार पाऊस झाला तरच नदी, नाले प्रवाहीत होणार आहेत. याचबरोबर जलाशयांमध्ये पाणी साचणार आहे. सध्या पाऊस होत आहे. मात्र म्हणावा तसा जोर नाही. त्यामुळे जोरदार पाऊस कोसळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच शेतकऱ्यांना शिवारातील विविध कामे करण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. यावर्षी जुलै महिन्या मध्यावर आला तरी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे साऱ्यांच्याच चिंता वाढल्या आहेत. मंगळवार- बुधवारी तर उन्हच पडले होते. त्यामुळे पावसाने दडी मारली म्हणून साऱ्यांचेच डोळे आकाशाकडे लागले होते. गुरुवारी मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी अधूनमधून सरी कोसळल्यामुळे दुचाकीस्वारांना रेनकोटचा आधार घ्यावा लागला तर पादचाऱ्यांनी छत्र्यांचा आधार घेतला. अचानकपणे जोरदार पाऊस कोसळत होता. मात्र काहीवेळच पाऊस पडत होता. त्यानंतर पुन्हा गायब होत होता. संततधार पाऊस पडला तरच पिके तारणार आहेत व पाण्याची समस्याही दूर होणार आहे. अन्यथा, यावर्षी गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.