बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी गणेशचतुर्थी दिवशी पावसाने अधूनमधून हजेरी लावली. त्याचबरोबर गुरुवारीदेखील पावसाच्या सरी कोसळत होत्या. सूर्यदर्शनही होत होते. एकंदरीत ऊन-पावसाचा खेळ अनुभवावयास मिळत आहे. पण गणेश उत्सवातच पावसाने हजेरी लावल्याने गणेशभक्तांचा हिरमोड झाला आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नदी-नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मार्कंडेय नदीकाठची शेती दुसऱ्यांदा पाण्याखाली गेली. तसेच बळ्ळारी नाल्यालाही पूर आल्याने हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दुबार पेरणी केलेली पिकेही धोक्यात आली आहेत. निदान गणेशोत्सवात तरी पाऊस उघडीप देईल, अशी शक्यता गणेशभक्तांतून व्यक्त केली जात होती. पण बेळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गणेशचतुर्थी दिवशीच शहर व तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सार्वजनिक, तसेच घरगुती गणेशमूर्ती प्लास्टिक झाकून आणाव्या लागल्या. तसेच बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाही पावसामुळे समस्यांना तोंड द्यावे लागले. गुरुवारीही सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या.









