पावसामुळे बऱ्याच ठिकाणी चिखलमय परिस्थिती
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारीही शहरासह उपनगर व ग्रामीण भागामध्ये पाऊस बऱ्यापैकी झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शहरामध्ये तसेच उपनगरांमध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मुख्य बाजारपेठेमध्येही दलदल झाली होती. शनिवार असल्यामुळे खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी दिसून आली. या पावसामुळे खरेदीदार व बैठ्या व्यापाऱ्यांना काहीसा त्रास सहन करावा लागला.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे साऱ्यांनाच थोडासा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी अजूनही दमदार पावसाची गरज आहे. कारण नदी, नाले यांचा प्रवाह सुरू होण्यास मोठ्या पावसाची गरज आहे. पावसामुळे सध्या असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र पिके पूर्ण क्षमतेने येण्यासाठी नदी, नाले, जलाशये तुडुंब भरणे गरजेचे आहे. याचबरोबर जमिनीमध्ये पाणी झाले तरच पिके तग धरणार आहेत. त्यामुळे बळीराजाची नजर मोठ्या पावसाकडेच आहे.
शनिवारी सकाळपासूनच पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. अचानकपणे दमदार सरी आल्यानंतर काहीवेळ पाऊस उसंत घेत होता. या पावसामुळे स्मार्ट सिटीमध्ये सुरू असलेल्या अर्धवट कामांचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. रेल्वेओव्हरब्रिज ते गोवावेस सर्कलपर्यंतच्या रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्र्राज्य पसरले आहे.
शनिवारी सकाळची शाळा असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना रेनकोटचा आधार घेत शाळांना जावे लागत होते. पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे पादचाऱ्यांना छत्र्या घेऊनच घराबाहेर पडावे लागत होते. गोवा आणि महाराष्ट्र राज्यापेक्षा बेळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झाल्याचे दिसून येत आहे.
पावसामुळे दिवसभर हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता. दिवसभर पाऊस कोसळल्यामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, भाजीविक्रेते व इतर व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती. पाऊस सुरू असल्यामुळे प्लास्टिक तसेच मोठ्या छत्र्यांचा आधार घ्यावा लागत होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काहीसा दिलासा दिला आहे.









