देशाला नव्या राष्ट्रपतींचे वेध लागले आहेत. सत्तारुढ भारतीय जनता पक्षाकडे संख्याबळ आहे. ओघानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाची कोअर टीम आणि संघ परिवार राष्ट्रपतीपदाचे नाव निश्चित करणार हे स्पष्ट आहे. ही निवड मतदानाने होते की बिनविरोध आणि यासाठी कुणाचे नाव पुढे येते याबद्दल जशी उत्सुकता आहे तशी यानिमित्ताने भाजप काही धक्कातंत्र अवलंबणार का? असाही सवाल आहे. एकमात्र नक्की आहे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मुदतवाढ दिली जाणार नाही हे स्पष्ट दिसते आहे. 2017 साली भाजप व मित्र पक्षांनी त्यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली व सुमारे 65 टक्के मते मिळवून ते विजयी झाले. आता त्यांचा कार्यकाल पूर्ण होतो आहे. ओघानेच नव्या निवडीसाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठीची निवडणूक आयोगाने घोषणाही केली आहे व विविध राजकीय पक्षांच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 18 जुलैला मतदान होणार असून 21 जुलैला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार सर्व संमतीने एकमताचा झाला तर निवड बिनविरोध होईल व देशाला सोळावे राष्ट्रपती मिळतील. रामनाथ कोविंद दलित नेते राष्ट्रीय पातळीवर फारसे नव्हते. भाजपने अचानक त्यांचे नाव पुढे केले आणि मग विरोधकांनी मीराकुमार यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढवली होती. कोविंद यांनी देशाची प्रतिमा उंचावत, कोरोनासारख्या महामारीच्या काळात राष्ट्रपतीपद सांभाळले. त्यांचा उत्तर अधिकारी कोण होणार याबद्दल तर्क-वितर्क लढवले जात आहेत. भारत हा मोठा देश आहे. अनेक जाती, धर्म, पंथ, प्रवाह, संस्कृती यांचे अनोखे व मनोहर असे येथे एकत्रीकरण आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय पक्ष, त्यांची मते, विचारसरणी, कार्यपद्धती आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपाने उमेदवार जाहीर केलेला नाही. पण भाजपाचा उमेदवार विजयी होणार हे पक्के असल्याने भाजप सर्व संमतीचा बिनविरोध राष्ट्रपती देशाला देता येऊ शकतो का या प्रयत्नात आहे. भाजपच्या दृष्टीने राष्ट्रपतीपदासाठी चांगली व्यक्ती देणे आणि राजकीय, सामाजिक व विभागीय समीकरणे सांभाळणे ही कसोटी आहे. खरेतर देशाची एकता, अखंडता उंचावणारी व देशाला महासत्ता बनविण्यासाठी दिशा देणारी, देशाचा तिरंगा उंचवणारी व्यक्ती राष्ट्रपती झाली पाहिजे. भाषा, प्रांत, जात, धर्म असे संकुचित विचार व राजकीय समीकरणे दूर सारुन या पदासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. पण आपल्याकडे जात-धर्माच्या मतपेटय़ा बळकट असल्याने ते शक्य होईल असे वाटत नाही. विरोधी पक्षांच्या पातळीवर गेले काही दिवस जोरदार हालचाली सुरु आहेत. विरोधकांच्या युपीएमध्ये उमेदवारीवरुन एकमत नाही. पण शिवसेना, आप, तृणमूल काँग्रेस यांनी शरद पवार यांचे नाव सुचवले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे अत्यंत सावध व चाणाक्ष नेते आहेत. त्यांनी आपण उमेदवारीसाठी इच्छुक नाही असे सांगत माजीमंत्री गुलामनबी आझाद यांचे नाव पुढे केले आहे. पवारांनी जबाबदारी झटकताना काँग्रेस आणि मुस्लीम मतपेटीला खुणावले आहे. काँग्रेसचे धोरण अद्याप कळलेले नाही. ममता बॅनर्जी यांनी सर्वपक्षीय 22 नेत्यांची बैठक बोलावली आहे. पण पवारांनी या पदासाठी हात झटकले, शिवसेना अयोध्येत आदित्य ठाकरे दौरा करण्यात गुंग आहे आणि काँग्रेस नेते ईडीच्या चौकशीत अडकले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत विरोधकांचे नाव ठरेल असे दिसत नाही. ही निवडणूक सरळ होणार की तिरंगी याबद्दलही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एकूणच पराभूत होण्यासाठी कुणी दांडगा नेता तयार होणे कठीण आहे. शिवसेना पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून काल-परवा पर्यंत शरद पवारांचा उल्लेख करत असे पण सेनेच्या धोरणात बदल दिसतो आहे. आता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देशाचे नेते असे म्हटले जाते व शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घेतले जाते. अर्थात हे सारे होईल तेव्हा होईल. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीवरुन सहाव्या जागेसाठी जो ताण-तणाव झाला व शिवसेनेच्या दुसऱया उमेदवाराला पराभूत होण्याची वेळ आली त्याचे खापर संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर व उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थकांवर फोडल्याने राष्ट्रवादीत संजय राऊत यांचे संदर्भात नाराजी दिसते आहे. ती कमी करण्यासाठी संजय राऊत शरद पवारांचे नाव राष्ट्रपती पदासाठी घेत आहेत असे म्हटले जाते. तथापि शरद पवारांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीत रस नाही. पवारांना आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत पराभवाची चव माहिती नाही ते सावध, मुरब्बी व दूरदृष्टीचे आहेत. कुणीही हरहर म्हटले म्हणून ते चितेत उडी मारणार नाहीत. भाजपाकडून कुणाला संधी मिळते हे बघायचे. दक्षिण भारत की उत्तर भारत, राजकीय की अराजकीय, महिला की पुरुष, मागासवर्गीय की सवर्ण, हिंदू की मुस्लीम असे अनेक आयाम या निवडीला आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना प्रमोशन इथंपासून जगभरातील मुस्लीम बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी नवे कलाम इथंपर्यंत चर्चा आहेत. भाजपच्या गोटात ज्या नावाची चर्चा आहे त्यामध्ये नितीशकुमार, सुमित्रा महाजन, आनंदीबेन पटेल, द्रौप्रदी मुरमी, अनुसया उईके, लालकृष्ण आडवाणी, केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान, भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी अशी अनेक नाव आहेत. एखादा शास्त्रज्ञ, अर्थतज्ञ याचाही विचार होऊ शकतो. ठाम व ठोस असे काही आतापर्यंत पुढे आलेले नाही. भाजपने राजनाथसिंग व अमित शहा यांना शोध व चर्चा करण्याचे अधिकार दिले आहेत. नरेंद्र मोदी धक्कातंत्र अवलंबू शकतात. राष्ट्रपती रबर स्टॅम्प नसावा असेही मानले जात आहे. मुस्लीम वा आदिवासी महिलाही विचारात घेतली जाऊ शकते. भारताचे राष्ट्रपतीपद हे मोठे व जबाबदारीचे आहे. ओघानेच त्यावर कोण विराजमान होते हे बघावे लागेल.
Previous Articleनिवृत्तीचे वय, पेन्शन वाढणार
Next Article 90 दिवसांमध्ये होणार पहिली भरती रॅली
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








