आमदार प्रेमेंद्र शेट यांचे प्रतिपादन : कुडचिरे सरकारी हायस्कूलच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन, शैक्षणिक दर्जासह साधनसुविधांची चांगली सोय
डिचोली : मये मतदारसंघातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा साधनसुविधा विकासाबरोबरच मानवी विकास होऊन मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती सुखी समाधानी व्हावी, हे एकच ध्येय बाळगून आपण मतदारसंघात काम करीत आहे. गेल्या एका वर्षात मये मतदारसंघाच्या झालेल्या विकासाचे सर्व साक्षीदार आहे. येणाऱ्या काळात या मतदारसंघाला राज्यातील आदर्श व विकसनशील मतदारसंघ बनविण्यासाठी आपण प्रयत्न करणार. विकासकामांमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह इतर सर्व खात्यांच्या मंत्र्यांचे बहुमोल सहकार्य लाभत असल्याने मयेच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन मयेचे.आमदार प्रेमेंद्र शेट यांनी कुडचिरे येथे केले. कुडचिरे डिचोली येथील से. ले. जयेंद्र जे. राणे सरकार हायस्कूलच्या विस्तारीत इमारतीच्या उदघाटनप्रसंगी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, सरपंच प्रियंवदा गावकर, उपसरपंच तुळशीदास चिबडे, साबांखाचे कार्यकारी अभियंता सिताराम नाईक, मुख्याध्यापक श्रीकृष्ण नाईक, स्थानिक पंचसदस्या अंजली च्यारी आदींची उपस्थिती होती.
कुडचिरे सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांनी भरून चालणाऱ्या या हायस्कूलचे संकुल हे खासगी शिक्षण संस्थांनाही लाजवणारे आहे. या हायस्कूलची योग्य देखरेख मुख्याध्यापकांनी ठेवली असल्याने ही शाळा यशस्वीपणे व व्यवस्थितपणे वाटचाल करीत आहे. या सरकारने शिक्षणाच्या दर्जासह विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या साधनसुविधांमध्ये भर घातला आहे. म्हणूनच आज पालकांचा कल सरकारी हायस्कुलांकडे जास्त दिसून येत आहे, असेही आमदार प्रेमेंद्र शेट पुढे म्हणाले. ग्रामीण भागातील चांगले चालणारे हे हायस्कूल असून निकालाची परंपराही या हायस्कूलने चांगली ठेवली आहे. आज गावातील हायस्कूल सुरक्षित असून गावातील पालकांनी आपल्या मुलांना या शाळांमध्ये घालावे. नावाजलेली शाळा हायस्कूल म्हणून शहरातील हायस्कुलांमध्ये पाठवू नये. गावातील पालकांनी स्वत: हा विचार ठेवल्यास गावातील शिक्षणाचा व हायस्कूलांचा दर्जा सुधारणार. आणि आपल्या विद्यार्थ्यांचा गावतीलच वातावरणात शैक्षणिक व संस्कारीत विकास होणार, असे यावेळी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी म्हटले. या हायस्कुलच्या विस्तारित कामाची पायाभरणी माजी सभापती स्व. अनंत शेट यांनी केली होती. काही तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित राहिलेले या इमरतीचे काम आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागले व पूर्णही झाले. या इमारतीचे फित कापून, समई प्रज्वलित करून व कोनशिलेचे अनावरण करून आमदार शेट यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीकृष्ण नाईक यांनी केले. सूत्रसंचालन विनय टकले यांनी केले. आभार मनोज नाईक यांनी मानले.









