कोल्हापूर :
विधानसभेच्या निवडणूकीमध्ये महायुतीची एकतर्फी झालेल्या विजयानंतर राज्यात ईव्हीएम मशिनबाबत तक्रारीचा सुर उमटत आहे. राज्यभरातील 755 केंद्रावरील मतमोजणीवर अक्षेप घेण्यात आला आहे. यासंदर्भात 104 जणांचे तक्रार अर्ज निवडणूक आयोगाकडे आले आहेत. यामध्ये कोल्हापुरातील पाच मतदार संघातील 44 केंद्राचाही समावेश आहे. या ठिकाणी मॉक पोल घेण्यात येणार आहे.
विधानसभेच्या निवडणूकीमध्ये 225 हून अधिक जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. यानंतर विरोधकाकडून ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त झाले आहे. काही ठिकाणची मतांची आकडेवारीबाबतही प्रश्न उपस्थित झाले. राज्यातील राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 31 जिल्ह्यातील 95 विधानसभा मतदार संघामधून राज्य निवडणूक आयोगाकडे मतमोजणीबाबत तक्रार आल्या आहेत. 1 लाख 486 केंद्रापैकी 755 केंद्रांवर मॉक पोल घेण्यात येणार आहे. यामध्ये ईव्हीएमवरील यापूर्वी नोंदवलेली सर्व मते काढून टाकून त्यात नव्याने प्रत्येक केंद्रावर ठराविक चिन्ह देऊन प्रत्येकी 1400 मते नव्याने नोंदवली जाणार आहेत.
निकालानंतर आठ दिवसांत मतमोजणीबाबत काही हरकती असल्यास त्या थेट आयोगाकडे विचारणा करण्याची मुबा आहे. त्यानुसार कोल्हापूर जिह्यातील कोल्हापूर दक्षिण, उत्तर, करवीर, चंदगड व हातकणंगले अशा पाच मतदारसंघांतून प्रत्येकी एक तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीत किती केंद्रांवर फेर मतदान घ्यावे, अशी मागणी संबंधितांनी केली आहे. एका केंद्रासाठी 47 हजार 200 याप्रमाणे शुल्क भरून घेतले आहे. करवीरमधून सर्वाधिक 14 केंद्रावरील मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. चंदगडमधील पाच, कोल्हापूर दक्षिणमधील दहा, उत्तरमधील पाच तर हातकणंगलेतील 10 केंद्रांवरील मतदानावर आक्षेप घेतले आहेत.







