प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर ऐतिहासिक आहे. या ऐतिहासिक शहराचा विकास आराखडा करताना ऐतिहासिक वास्तूंच्या सौदर्यात भर पडावी, ऐतिहासिक महत्व वाढावे, मग त्यामध्ये शिवतीर्थ असेल, राजवाडा असेल यांचा प्राधान्यांना विचार व्हावा, नव्याने हद्दवाढ झालेल्या भागातील मोकळय़ा शासकीय मालकीच्या जागा आहेत त्याबाबत उचित कार्यवाही करुन विकास आराखडय़ात समाविष्ट कराव्यात. शहरातील ओढय़ांवर संरक्षक भिंत घालून किंवा स्लॅब टाकून सौदर्यात भर घालावी, अशा विविध सूचना बांधकाम व्यावसायिकांनी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संजय साखला व नगररचना विभागाचे हणमंत मोरे यांच्याकडे केल्या. दरम्यान, त्यांनीही शहराचा विकास आराखडा हा सर्वांना विचारात घेऊन तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शहरातील बांधकाम व्यवसायिकांची बैठक शहर विकास प्राधिकरणाच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला क्रिडाई, बिल्डर असोसिएशन, आर्किटेक्ट असोसिएशन यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सलिम कच्छी, सुनिल शिंदे, सुहास तारळेकर, राजेश देशमुख यांच्यासह उपस्थितांनी आपल्या सुचना मांडल्या. यामध्ये प्राधान्याने शहरामध्ये सध्या वाहतुकीची केंडी प्रचंड होत आहे. भाजी मंडईला भाजी आणायला गेलेल्या नागरिकांना गाडय़ा लावता येत नाही. भाजी घेऊन परत आल्यानंतर त्यांची गाडी लावलेल्या जागेवर नसते. वास्तविक शहरातील सर्वच भाजी मंडईबाबत पार्किंगचा प्रश्न सुटावा याबाबतची बाब प्रस्तावित आराखडय़ात होणे अपेक्षित आहे.
शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागांमध्ये काही ओपन स्पेस या शासकीय आहेत. त्याबाबतची माहिती अद्याप नाही. त्या जागेबाबत निश्चित धोरण ठरावे. शाहुनगरामध्ये पावसाच्या पाण्याची समस्या सतत भेडसावते. त्यावरही उपाययोजना मागच्या विकास आराखडय़ात करण्यात आलेला नव्हता. या आराखडय़ात करण्यात यावा जेणेकरुन होणारी अडचण दूर होईल. तसेच शहरातील जे ओढे आहेत. त्या ओढय़ावर स्लॅब टाकून छोटय़ा गार्डन करता येतील का शहराच्या सौदर्यात भर पडेल, अशीही सूचना मांडण्यात आल्या. तसेच शहरात ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत. त्या वास्तू टिकाव्यात यासाठी प्रयत्न व्हावेत, असाही मुद्दा उपस्थित केला. तब्बल दीड तास यावर चर्चा झाली.
सप्टेबर 23 पर्यंत विकास आराखडा तयार होईल
सातारा शहराचा विकास आराखडा करण्याचे काम सुरु आहे. त्याच अनुषंगाने लोकांची मते जाणून घेत आहोत. शहरातील जे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना शहरात काय काय हवे आहे काय काय नको आहे हे जाणून घेतले आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत हा विकास आराखडा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती नगररचना विभागाचे हणंमत मोरे यांनी दिली.








